BJP, Congress News : महत्त्वाची शहरं सोडून भाजप वळली साकोलीकडे, नानांचा धसका घेतला?

Bhandara - Gondia : कार्यक्रम सांस्कृतिक, पण राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरतोय.
Devendra Fadanvis, Sunil Mendhe and Nana Patole
Devendra Fadanvis, Sunil Mendhe and Nana PatoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhandara and Gondia Political News : आजपासून भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमध्ये दोनदिवसीय वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात होत आहे. भारतीय जनता पक्षाचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे हे स्वतः या महोत्सवाचे आयोजक आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. (The program is becoming culturally, but also politically important)

गर्दीच्या दृष्टीने हा कार्यक्रम साकोली शहरातील होमगार्ड परेड ग्राउंडवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचा आयोजनस्थळावरून राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण खासदार महोत्सवासाठी भंडारा जिल्ह्यात अनेक महत्त्वाची ठिकाणं उपलब्ध आहेत. तरीही भाजपने हा कार्यक्रम साकोली येथेच का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हा कार्यक्रम साकोलीत घेण्यामागे राजकीय कारण आहे. साकोली हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहतालुका आहे. त्यामुळे आपला विरोधक तगडा असल्याने निवडणुकीपूर्वी आपली रंगीत तालीम करण्यासाठी भंडारा भाजपद्वारे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वारसा जपत नाना पटोले यांच्या साकोली (साकोली-लाखनी- लाखांदूर) विधानसभा मतदारसंघात खासदार महोत्सवाचे आयोजन केले आहे.

हे आयोजन भंडारा शहर किंवा इतरत्र कुठेही करता येऊ शकले असते, पण हटकून साकोलीतच केले गेल्यामुळे त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. भाजपने आतापासूनच नाना पटोले यांचा धसका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. येणारी लोकसभा निवडणूक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात लढण्याची तयारी काँग्रेस पक्षाने चालवली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे.

राहुल गांधी यांच्या ‘मास्टर प्लॅन’चा प्रमुख उद्देश काँग्रेसच्या जुन्या मतदाराला जोडणे हा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाना पटोलेंनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. नानांनी स्वतः नेतृत्व करत तीन ते १३ सप्टेंबर या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत संकल्प पदयात्रा काढली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी नानांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

आता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजपच्या विरोधात काँग्रेसने नाना पटोलेरूपी आपला तगडा उमेदवार जाहीर केल्याने भाजपने याचा धसका घेणे साहजिक आहे. त्यामुळे साकोली येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत असल्याने या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. खासदार सुनील मेंढे यांचा हा महोत्सव म्हणजे प्रचाररूपी रंगीत तालीम मानली जात आहे. हा कार्यक्रम जरी सांस्कृतिक असला तरी राजकीयदृष्टया महत्त्वाचा मानला जात आहे.

Edited By : Atul Mehere

Devendra Fadanvis, Sunil Mendhe and Nana Patole
Bhandara Collector News : नांदेडमध्ये ठेच लागली... भंडारेकर झाले शहाणे; आले ‘अलर्ट मोड’वर, जिल्हाधिकाऱ्यांचे जागरण !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.