
Gadchiroli News: खळबळजनक आणि बेछूट आरोप करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार सर्वांनाच अंगावर घेत असतात. आलटून पालटून ते महायुती सरकारमधील नेत्यांच्या विरोधात राग व्यक्त करीत असतात. अलीकडेच त्यांनी गडचिरोलीत जाऊन महायुती सरकारमधील तीनही पक्षांना जिंदाल कंपनी पाचशे कोटी रुपये देणार असल्याचा दावा केला. त्यामुळे भाजपचे नेते चांगलेच चिडले आहेत. वडेट्टीवारांच्या तोंडाला लगाम घालण्यासाठी त्यांच्यामागे ईडी लावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार अशोक नेते यांनी केली आहे.
वडेट्टीवारांनी जिंदाल कंपनीला अल्प महसुलावर लोहखनिज देण्याचे षडयंत्र महायुती सरकारने रचले आहेत. या बदल्यात तीनही पक्षांना पाचशे कोटी रुपये दिले जाणार असल्याचा आरोप केला. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. वडेट्टीवार नेहमची बेछूट आरोप करून आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. त्यात किती तथ्य आहे हेसुद्धा जाणून घेण्याची तसदी घेत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायची सवय लागली आहे, असे अशोक नेते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने मागास गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. मोठ मोठे प्रकल्प येथे येऊ घातले आहेत. कोट्यवधींची गुंतवणूक होणार आहे.
गडचिरोलीला स्टिल सिटी करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. गडचिरोलीचा विकास होत आहे हे कदाचित वडेट्टीवार आणि काँग्रेसला बघवत नाही. त्यामुळे ते विकास कामात खोडा घालण्याचे प्रयत्न करीत आहे. जिंदाल कंपनीला अल्प महसुलावर लोहखनीज देण्याचे षडयंत्र रचण्यात आले आले असे त्यांचे म्हणणे आहे.
याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पदरात अधिग्रहित केल्या जाणार असल्याचे ते म्हणतात. मात्र भाजपनेच भूमिअधिग्रहण कायदा आणला आहे हे त्यांना ठावूक नसावे. या कायद्यानुसार चारपट मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्त दरात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही अशोक नेते यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे प्रदूषण वाढण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला होता. हा प्रकल्प गावात होणार नाही. तो लांब आहे. त्यामुळे गावकऱ्यांना प्रदूषणाचा धोका नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस नेते शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करत आहेत. मी दहा वर्ष गडचिरोलीचा खासदार होतो. त्या काळात मी मंजूर करून आणलेल्या प्रकल्पांचे भूमिपजून व लोकार्पण करण्याचे काम फक्त काँग्रेसचे खासदार डॉ. नामदेव किरसान करीत आहेत.
गेल्या दहा वर्षांतील माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली तेवढी मागील ५० वर्षांत झाली नाही. विद्यमान खासदारांनी आरोप करण्यापूर्वी एकतरी प्रकल्प गडचिरोलीच्या विकासासाठी आणला का, किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले हे जाहीर करावे नंतर आरोप करावे असा सल्लाही यावेळी नेते यांनी दिला. आमच्यावर चंदा गोळा केल्याचा आरोप करतात पण प्रत्यक्षात काँग्रेसचेच नेते चंदा गोळा करीत असल्याचा आरोपही यावेळी अशोक नेते यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.