
BJP Politics : नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करायची की नाही यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार येताच हा निर्णय फिरवण्यात आला होता. आता पुन्हा बरखास्तीच्या मागणीने उचल खालली आहे. भाजपचे आमदार यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे नागपूर शहराचा नवा विकास आराखडा तयार करून शहरातून नासुप्रला हद्दपार करण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे.
ब्रिटीशांच्या काळापासून नागपूर सुधार प्रन्यास अस्तित्वात आहे. टाऊन प्लॅनिंग करण्यासाठी ही प्रन्यासची स्थापना ब्रिटीशांनी केली होती. नागपूर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सुधार प्रन्यास बरखास्त करणे अपेक्षित होते. मात्र ती आजही कायम आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन विकास संस्था काम करीत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. शहरातील काही ले-आऊट्स, रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा, क्रीडांगणाच्या विकासासाची जबाबदारी महापालिकेची आणि सुधार प्रन्यासची आहे. यामुळे अनेकदा विकास कामांवरून व देखभाल दुरुस्तीवरून दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष निर्माण होत असतो.
सुधार प्रन्यासच्या दुर्लक्षामुळे शहरात अनधिकृत ले-आऊट निर्माण झाल्याचा आरोप आहे. याशिवाय कराचा दुप्पट भुर्दंड नागरिकांवर लादला जात आहे. टाऊन प्लानिंग करण्याची नागपूर सुधार प्रन्यासची उपयोगिता आता संपली आहे. नागपूर मेट्रो रिजनची स्थापन झाली असल्याने शहराच्या 25 किलोमीटरच्या बाहेरचा भाग विकसित करण्याची जबाबदारी मेट्रो रिजनची आहे. नागपूर सुधार प्रन्यासला यात विलिन करण्याची मागणी केली जात आहे. महायुतीच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर सुधार प्रन्यासची मागणी केली होती. प्रन्यासमुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होताच आता नागपूर सुधार प्रन्यासला थेट बरखास्त करण्याऐवजी शहरातील त्यांचा हस्तक्षेप बंद करण्याचा आणि अधिकार काढून घेण्यासाठी एक प्लान तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहे.
आराखडा तयार करताना महापालिकेची जागा, नागपूर सुधार प्रन्यासचे क्षेत्र अशी वर्गवारी केली जाणार नाही. संपूर्ण शहरासाठी एकच आराखडा राहरणार आहे. त्यानंतर सुधार सुधार प्रन्यासला नागपूर शहरातील हस्तक्षेप आपसूकच बंद केला जाणार आहे. प्रन्यासचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागपूर मेट्रो रिजनमध्ये सामावून मेट्रो रिजनचा विकासाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीचे आश्वासन भाजपने निवडणुकीत दिले आहे. अशा पद्धतीने आश्वासन आणि भाजप आमदारांच्या मागणीची पूर्तता केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.