Nagpur : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमानप्रकरणी विदर्भात भाजपचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, अमरावती, अकोल्यासह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी भाजपने निदर्शने करीत काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार कल्याण बॅनर्जी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा निषेध केला.
संसदेला स्मशानभूमी संबोधण्याचा प्रकार म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे. गांधी, बॅनर्जी, राऊत यांना तसे वाटत असल्यास ते संसदेचे प्रतिनिधित्व कशाला करतात? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. अवमान प्रकरणावरून सत्ताधारी भाजपने विरोधकांना घेरले. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतीन नेत्यांच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. संवैधानिक पदाचा अवमान केल्याने खासदार राहुल गांधीसह इतर खासदारांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या विदर्भातील सर्व आंदोलनांमधून करण्यात आली.
खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायर्यांवर बसत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करीत घटनात्मक पदाचा अवमान केला आहे. राहुल गांधी यांनी बॅनर्जींच्या या टोमण्यांचा व्हिडीओ तयार केला. लोकशाहीवर हा डाग आहे. या घटनेच्या विरोधात नागपूर येथे भारतीय जनता पार्टीने निषेध आंदोलन केले. महानगर अध्यक्ष जितेंद्र ऊर्फ बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. महालावर टिळक पुतळा चौकातही निदर्शने करण्यात आली.
महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रगती पाटील, राज्य महिला मोर्चाच्या वैशाली चोपडे, सरचिटणीस गुड्डू त्रिवेदी, संदीप गवई, भोजराज डुंबे, विष्णू चांगदे, युवा मोर्चा अध्यक्ष बादल राऊत, चंदन गोस्वामी, श्रीकांत आगलावे, राम अंबुलकर आदींनी यावेळी काँग्रेसचा तीव्र शब्दात निषेध केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोल्यात भाजपने गुरुवारी (ता. 21) निषेध आंदोलन केले. खासदार राहुल गांधी, खासदार कल्याण बॅनर्जी, खासदार संजय राऊत यांना संसद स्मशानभूमी वाटत असेल तर ते संसदेचे प्रतिनिधित्व कशाला करतात? असा सवाल भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केला. जयप्रकाश नारायण चौकात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे, किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात भापजच्या कार्यकर्त्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या पोस्टरला जोडे मारले. गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष यशुलाल उपराडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या वतीने धनखड प्रकरणी संपूर्ण देशभरात आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही प्रत्येत तालुका व मुख्यालय स्तरावर आंदोलन करण्यात आले. सर्वच आंदोलकांच्या माध्यमातून काँग्रेस आणि सर्व खासदारांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.