Nagpur Winter Session: शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सरकारकडून लपवाछपवी?

Vidhan Bhavan Panic Created By Farmer : विधान भवनासमोर घोषणाबाजी करीत मुख्य प्रवेशद्वारावरच घेतले विषारी द्रव्य
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना विधान भवनाची सुरक्षा भेदल्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. यात एका शेतकऱ्याने विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांनी विषारी द्रव्य प्राशन करताच काही वेळातच त्याची प्रकृती खालावली. मुख्य प्रवेशद्वारावरच तो कोसळल्याने पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली. हा प्रकार सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी संबंधित शेतकऱ्याला इस्पितळाकडे रवाना केले. या घटनेबाबत कुणालाही कळणार नाही, याची पूर्ण दक्षता पोलिसांनी व विधान भवन परिसरातील अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, हा प्रकार उघडकीस आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagpur Winter Session
Maratha Reservation : सरकारने मराठ्यांना आरक्षणाचे गाजर दाखवले; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधक बरसले

सचिन उत्तम बहादुरे (वय 29) हे विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सचिन हे मंगळवारी (ता.19) विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. सरकार शेतीमालाला योग्य भाव देत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आपण जीव देत असल्याची घोषणा सचिन यांनी केली. त्यानंतर तातडीने त्यांनी खिशातील कीटकनाशकाची बाटली काढली व त्यातील द्रव्य प्राशन केले.

काही सेकंदातच सचिन हे मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोसळले. ही बाब लक्षात येताच विधान भवनाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ तैनात सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने सचिन यांना उचलले आणि वाहनातून इस्पितळाकडे रवाना केले. हा प्रकार घडला तेव्हा सरकारमधील काही मंत्री व आमदार मुख्य प्रवेशद्वारातून आत येत होते.

घटनेनंतर नेमके काय झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची प्रकृती खालावली, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा या प्रकरणाचा उलगडा झाला आणि सचिन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. सचिन हे यवतमाळ जिल्ह्यातील मोरथ जहागीर या गावातील रहिवासी आहेत. विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी यवतमाळ जिल्ह्याचे नाव सर्वांत वर आहे.

सचिन बहादुरे हे विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा भेदल्याच्या कारणावरून पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईपासून वाचवण्यासाठी या प्रकाराबद्दल लपवाछपवी केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक आहे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील विदर्भात आंदोलन सुरू केले आहे.

त्यातच शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असता तर विधान भवनात मोठी खळबळ उडाली असती व त्याचे पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये उमटले असते. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Nagpur Winter Session
Maratha Reservation : मराठा समाजाचं आरक्षण का गेलं? मुख्यमंत्र्यांनी 'ती'आकडेवारी सांगितली...

विष प्राशन केलेल्या सचिन बहादुरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सचिन विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कसे काय पोहोचले, हा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावत आहे. विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून केवळ अतिमहत्त्वाचे व्यक्ती, मंत्री आणि आमदारांनाच प्रवेश दिला जातो.

प्रवेशद्वारापर्यंत सहजासहजी पोहोचता येत नाही. काही अंतरापूर्वीच सुरक्षा पास नसलेल्या किंवा विधान भवनाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना पोलिस अडवतात. मात्र, सचिन बहादुरे तेथे कसे काय पोहोचले याचा तपास पोलिस करीत आहेत. अशात सचिन यांनी कोणत्या कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला, हे मात्र दुर्लक्षित केले जात आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Nagpur Winter Session
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची बाजू न्यायालयात कोण मांडणार, आमदार राणाजगजितसिंह म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com