Lok Sabha Election 2024 : भारतीय स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा होईल तोपर्यंत देशात ‘शत प्रतिशत भाजप’चे स्वप्न साकार करण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. यासाठी आता भाजप जोमाने कामाला लागली आहे. जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटविणे, अयोध्येत राम मंदिराचे निर्माण, तीन तलाक एवढ्यापुरतेच भाजपचे राष्ट्रनिर्माण मिशन मर्यादीत नाही. ही तर सशक्त भारताची सुरुवात आहे. राष्ट्रनिर्माणासाठी व भारताला महासत्ता बनविण्याची मोठी मोहीम भाजपने हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची सुरुवात आता लोकसभा निवडणूक 2024 पासून होत आहे.
सत्ता हातात असेल, तर काय नाही साध्य करता येत, याचे उदाहरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अकोल्यात दिले. त्यामुळे बहुमताचा आकडा वाढवित तो ‘चारसौ पार’ नेण्याचे ‘टार्गेट’ सध्या आहे. बहुमताच्या पुढे जात पुढील 25 वर्षे अर्थात 2049 पर्यंत देशात भाजप केवळ सर्वांत मोठा नव्हे तर शक्तिशाली पक्ष बनविण्यासाठी नेते प्रयत्न करणार आहेत. जनसंघाच्या स्थापनेपासून आजच्या भाजपपर्यंत पक्षाजवळ पंतप्रधान पदासाठी सक्षम असलेले अनेक चेहरे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाची जनता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहात आहे. योगी यांच्यासह पक्षातील अनेक असे दिग्गज नेते आहेत, जे तितक्याच ताकदीने पक्षाची ध्येयधोरणे सक्षमपणे राबवू शकतात. त्यामुळे केवळ 2024 नव्हे तर पुढील पाच टर्म अन्य पक्षाच्या ताब्यात सत्ता जाणार नाही, यासाठी भाजप सकारात्मक विकासाच्या जोरावर प्रयत्न करणार आहे. समान नागरी कायदा, घुसखोरीला पूर्णत: प्रतिबंध, अखंड भारत असे अनेक हेतू साध्य करण्याचा मार्ग अद्यापही खडतर आहे. लोकसभेसह राज्यसभा आणि राज्यांमध्ये सत्ता असेल तर ‘अजेंडा’ लवकरच पूर्ण करता येतो हे भाजपला ठाऊक आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने लगेचच जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याला हात घातला नाही. पहिल्या ‘टर्म’मध्ये सगळ्या विषयांची सर्वंकष माहिती घेत 2019 नंतर एक एक करीत अशा प्रकरणाचा निपटारा केला. आता समान नागरी कायदा आणि अन्य महत्त्वाचे विषय भाजपच्या यादीवर आहेत. 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर यापैकी अनेक विषयांना सरकार हातावेगळे करणार आहे. अशाच कामांच्या जोरावर पुढील 25 वर्षांचा ‘रोडमॅप’ भाजपने तयार केला आहे. अलीकडच्या काळात भाजप ‘ठरवेल तेच करून दाखवणारा’ पक्ष बनला आहे. त्यामुळे सध्या मोदी-शाह जोडी आणि नंतर योगी अटलबिहारी वाजपेयी यांचे ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ हे स्वप्न साकार करत राहणार आहेत, यात दुमत नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.