अकोला : अकोला, वाशीम, बुलडाणा मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला (MahaVikas Aghadi) मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) गोपीकिशन बाजोरिया यांचा भाजपचे (BJP) उमेदवार वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी पराभव केला आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा विधान परिषदेत जाण्याचे बाजोरिया यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. हा पराभव बाजोरिया यांच्यासह महाविकास आघाडीसाठीही धक्कादायक मानला जात आहे.
गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoriya) हे सलग तीन वेळा म्हणजे २००४ पासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधान परिषदेवर निवडून जात होते. शिवसेनेकडून चौथ्यांदाही गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून खंडेलवाल यांनी त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं होतं. या निवडणुकीत 822 पैकी 808 मतदान झाले होते.
निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच खंडेलवाल यांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. त्यानंतर अखेरपर्यंत त्यांनी ही आघाडी कायम ठेवत बाजोरिया यांना धक्का दिला. खंडेलवाल यांना 443 तर बाजोरिया यांना 334 मतं मिळाली. 31 मते बाद झाली. महाविकास आघाडीकडे तीन पक्षांची एकूण चारशेहून अधिक मतं होती. तर भाजपकडे 245 मतदान होते.
पण राजकीय गणितं जुळवत भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. या निवडणुकीत आघाडीची मतंही फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. बाजोरिया यांना यापूर्वी तीन वेळा विजयी होताना भाजपच्या सदस्यांची साथ मिळत होती. यावेळी मात्र, त्यांच्याविरुद्धच लढण्याची वेळ आल्याने त्यांना आता अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांवर अवलंबून राहावे लागले होते. दुसरीकडे भाजपने अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे राजकारणातील गणितं ‘सरळ’ करून देताना हा एक गठ्ठा मतदार वळविण्याचे प्रयत्न केले असून, त्यात यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तिन्ही जिल्ह्यातील पक्षांची सदस्य स्थिती :
- काँग्रेस : १९१
- राष्ट्रवादी : ९१
- शिवसेना : १२४
-वंचित : ८६
-भाजप : २४५
- एमआयएम : ०७
- अपक्ष / आघाडी : ७८
-एकूण : ८२२
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.