नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचे तोंड बघावे लागले होते. कधी काळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नेतृत्व केलेला पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गढ होता. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने (Congress) अभिजित वंजारी (Abhijeet Wanjari) यांना उभे करून भाजपचा (BJP) गढ जमीनदोस्त केला होता. आता शिक्षक आमदार निवडणुकीची घंटी वाजली आहे. त्यासाठी सुमारे अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. यामध्ये बंडाची शक्यता लक्षात घेऊन शिक्षक मतदारसंघाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.
भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. माजी आमदार अनिल सोले यांच्यावर पदवीधरमध्ये अन्याय झाल्याने त्याची परतफेड शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून करावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांची आहे. दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. आमदार नागोराव गाणार यांचे नेहमी प्रमाणे वेट अँड वॉच सुरू आहे. कुठल्याच नावावर एकमत होणार नाही असा त्यांच्या कट्टर समर्थकांचा दावा आहे. दुसरीकडे नेत्यांच्याच मागे किती दिवस फिरणार असे सांगून राजू कनाटे यांनी आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे सर्वांनाच स्पष्टपणे सांगितले. त्यांनी आपला एक प्रचार दौरा आटोपलासुद्धा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार अनिल सोले यांनाही त्यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट पूर्वसूचना त्यांनी दिली आहे. माजी महापौर आणि विद्यापीठाच्या राजकारणात सध्या प्रचंड सक्रिय असलेल्या कल्पना पांडे यासुद्धा मोर्चेबांधणी करीत आहेत. योगेश बन यांचा नेहमीप्रमाणे दावा अद्यापही कायमच आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली असल्याने त्यांची मर्जी उमेदवारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेत असलेली अनेक बडी नावे कापल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता राज्यात राजकारणात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची अडचण होऊ शकते.
पदवीधरची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता भाजप सावध भूमिकेत आहे. भाजप समर्थक आमदार नागोराव गाणार दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहे. आपसातील मतभेदांमुळे हा मतदारसंघसुद्धा हातून जाऊ नये, याची पुरेपूर काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवार देताना गटबाजी टाळण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.