

Buldhana News: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तब्बल 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या बँकेच्या या निवडणुकीत शिंगणे कुटुंबानं पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ.राजेंद्र शिंगणे यांची बुधवारी(ता.9 सप्टेंबर) बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.तर गोविंद मिरगे यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 संचालकांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. मात्र, 21पैकी 12 संचालक बिनविरोध निवडून आले. तर 9 संचालकांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकीत सहकार पॅनलनं तब्बल 7 जागांवर विजय मिळवला. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.
बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 संचालकांपैकी 12 जण बिनविरोध निवडून आले होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,कामगार मंत्री आकाश फुंडकर,माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. जिल्हा सहकारी बँकेच्या 65 वर्षांच्या इतिहासात शिंगणे परिवाराकडे तब्बल 31 वर्ष सत्ता राहिली आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठिशी बँक उभी राहणार असल्याचा शब्द दिला. तसेच ही बँक शेतकऱ्यांची असल्यामुळे त्यांना पीक,अल्प मुदत किंवा दीर्घ मुदत अशा सर्व शेतीपयोगी कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचंही म्हटलं. याचवेळी त्यांनी थकीत कर्जवसुलीचा इशाराही दिला.
बुलढाणा जिल्हा बँक सध्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत असून भविष्यात ती चांगल्याप्रकारे वाटचाल करेन असा विश्वासही नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनीही ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.
सुळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर शिंगणेसाहेब लोकहिताचे निर्णय घेत बँकेला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जातील,हा विश्वासही व्यक्त केला आहे. तसेच त्यांना या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छाही खासदार सुळे यांनी दिल्या आहेत.
गेल्या 16 वर्षांपासून बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक पार पडली नव्हती. प्रशासकामार्फत या कालावधीत बँकेचा कारभार चालवण्यात येत होता. मात्र,आर्थिक निर्बंध आणि रिझर्व्ह बँकेच्या विविध नियमांमुळे बँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.