
Vikas Thakre News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्याने पक्ष संघटना बांधणी सुरू केली आहे. त्यानुसार कार्यकाळ संपलेले सर्वच जिल्हा व शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. जिल्हानिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून फिडबॅक घेतला जात आहे.
नागपूरमध्ये 11 वर्षांपासून आमदार विकास ठाकरे शहर काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. या काळात प्रदेश काँग्रेसचे चार अध्यक्ष बदलले. मात्र ठाकरे कायम आहेत. त्यांना बदलण्यात यावे अशी जोरदार मागणी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करीत आहेत. त्यामुळे आता तरी नवा शहराध्यक्ष काँग्रेस देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्षाचे निरीक्षक माजी मंत्री रणजित कांबळे यांनी आपण अध्यक्ष बदलण्यासाठी आलो नसल्याचे स्पष्ट केल्याने नागपूर काँग्रेसमध्ये ठाकरे यांचेच वर्चस्व कायम राहणार असल्याचे दिसून येते. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या निर्देशावरून माजी मंत्री रणजित कांबळे स्थानिकांचे मते जाणून घेण्यासाठी तसेच राजकीय परिस्थितीची चाचपणी करण्यासाठी गुरुवारी नागपूरला येऊन गेले. त्यांनी सर्व ब्लॉक अध्यक्षांसोबत बंदद्वार वन टू वन चर्चा केली.
अध्यक्षांबाबत त्यांची मते जाणून घेतली. ते आपला अहवाल लवकरच प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार आहेत. मात्र जाता जात त्यांनी आपण अध्यक्ष बदलण्यासाठी नागपूरला आलो नाही तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची तयारी, संघटना बळकट करण्यासाठी आले असल्याचे स्पष्ट केले. त्यांचे वक्तव्य बघता महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत तरी ठाकरे अध्यक्षपदी कायम राहतील असे सांगण्यात येते.
विकास ठाकरे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडूण आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत कडवा मुकाबला केला. काँग्रेसच्या मताधिक्यांमध्ये वाढ केली. ते शहराचे महापौर होते. माणिकराव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ठाकरे यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले अध्यक्ष झाले. चारही अध्यक्ष काँग्रेसने बदलले. ठाकरे मात्र कायम राहिले.
रणिजत कांबळे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकालाची आकडेवारी बघता काँग्रेसची स्थिती नागपूरमध्ये मजबूत असल्याचे दिसून येते. महापालिका निवडणुकीची पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आपण आलो आहोत. काही ब्लाॅक अध्यक्ष बिलकूल ॲक्टिव्ह नाहीत. जो काम करणार नाही तो कुठल्याची नेत्यांचा समर्थक असो त्याला काढून टाकले जाईल. ज्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी स्वतःच पदावून दूर व्हावे. याकरिता जिल्हाध्यक्षांनी योग्य पाऊल उचलावे असे त्यांनी सांगून एकप्रकारे विकास ठाकरे यांना निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मोकळीक दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.