Chandrapur Ambedkari Society : आंबेडकरी समाज तसा एकसंध, पण राजकारणात उडाली दाणादाण; कारण...

Dr. Babasaheb Ambedkar : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र होते.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

विदर्भातील आंबेडकरी चळवळीचे दुसरे महत्त्वाचे केंद्रस्थान म्हणून नागपूरनंतर चंद्रपूरची वेगळी ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीतून दिलेल्या ऐतिहासिक धर्मदीक्षेनंतर चळवळीचा नवा आयाम लिहिला गेला. यानंतर बराच काळ येथील राजकारणातही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा दबदबा होता.

गेल्या अडीच दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात आंबेडकरी चळवळीची होत असलेली वाताहत आता समाजासाठी चिंतेचा विषय झाला आहे. बाबासाहेबांच्या नावाने निर्माण झालेले अनेक राजकीय पक्ष, त्यातून गटागटांत विभागले गेलेले कार्यकर्ते यामुळे समाजाची शक्ती कमी झाल्याची भावना सामान्य आंबेडकरी जनतेत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar
Chandrapur Latest News : भाजपच्या पाठिंब्याने सुनील फरकडे झाले बाजार समितीचे उपसभापती

चंद्रपूरचे श्रीमंत देवाजीबापू खोब्रागडे यांचा 125 वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ते चंद्रपूरचे पहिले आमदार होते. बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांच्याच वाट्याला आलेला. त्यांचे पुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र होते. ते राज्यसभेचे उपसभापती होते. चंद्रपूरच्या आंबेडकरी चळवळीला इतका समृद्ध राजकीय वारसा असताना आज मात्र राजकारणात होत असलेली दाणादाण विचार करायला भाग पाडणारी आहे.

1998 मध्ये राज्यातील संपूर्ण आंबेडकरी विचारांचे नेते एकत्र आले होते. त्यांनी एकीकृत रिपाइंच्या बॅनरखाली निवडणूक लढवली अन् रेकॉर्ड ब्रेक केला. चार खासदार निवडून आल्याने समाजाचे मनोबल कमालीचे वाढले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर लोकसभा क्षेत्रातून प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बाजी मारली होती. यानंतरचा काळ समाजासाठी राजकीयदृष्टया समृद्ध राहिला. पण आपल्या स्वार्थापायी नेत्यांनी स्वतःचे पक्ष उभारले. पक्ष उभारण्यातही राज्यात त्यांनी रेकॉर्डच केला. या रेकॉर्डमुळे त्यांनी सामान्य आंबेडकरी जनतेची विश्‍वासार्हता पूर्णतः गमावली.

सामाजिकबाबतीत आजही तेवढ्याच ताकदीने एक असलेला आंबेडकरी समाज राजकीयबाबतीत मात्र कमालीचा विखुरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आंबेडकरी समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यांची मते संपूर्ण लोकसभा व विधानसभा क्षेत्राचे गणित बदलवू शकतात. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपुरातही समाजाची मोठी ताकद आहे. पण निवडणुकीच्या वेळी ही मते नेमकी जातात कुठे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

या विषयांवर अनेकदा समाजाकडून मंथन झाले. मोठमोठ्या कार्यक्रमातून हा मुद्दा समोर आणला गेला. या विषयावर परिसंवादही घडविण्यात आले. पण त्याचे उत्तर भल्याभल्यांना सापडू शकले नाही. सामाजिकदृष्टया एकसंध असलेल्या या समुदायाची राजकारणात एवढी दाणादाण का होत आहे, हा प्रश्न यानिमित्ताने आता चर्चेला आला आहे. देशात संविधान धोक्यात आल्याच्या चर्चा चिंतनीय आहेत. यातूनच केंद्रातील सरकार हे बहुजनविरोधी असल्याची टीका नेहमीच होत आली आहे. आता आंबेडकरी समुदायाकडून मोठ्या अपेक्षा बहुजन समाजालाही आहेत. अशावेळी आपली राजकीय ताकद दाखविण्याची हीच खरी वेळ असल्याचे प्रतिबिंब समाजातून उमटत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता मदार वंचितवरच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या काळात अतिशय प्रभावीपणे घेतलेली राजकीय भूमिका आता अनेकांना पटू लागली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे चंद्रपूरचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना सव्वा लाख मते मिळाली होती. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. आता राजकीय ताकद निर्माण करायची असेल तर आपल्याला वंचितशिवाय पर्याय नाही, असा सूर आंबेडकरी समुदायातून उमटत आहे.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com