
Chandrapur latest political news : चंद्रपूरचे भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली आई ज्या स्थळावर टोपल्या विक्रीचा व्यवसाय करत होती, त्याचे नाव 'अम्मा चौक' करण्याच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेले चंद्रपूरचे सुपुत्र बाबुराव थोरात यांचे पुत्र विजय थोरात यांनी आमदार जोरगेवार यांच्या चौक'नामा'ची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस या तक्रारीची दखल कशी घेतात, आमदार जोरगेवार यांना कोणता आदेश देतात की, कारवाई करतात याकडे लक्ष लागलं आहे.
चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या पदपथावर भाजप (BJP) आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई जोरगेवार ऊर्फ अम्मा टोपल्या विक्रीचा व्यवसाय करायच्या. जोरगेवार आमदार झाल्यानंतरही त्यांचा टोपल्या विक्रीचा व्यवसाय सुरूच होता. आईच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या, यासाठी जोरगेवार यांनी विविध सामाजिक उपक्रम सुरू केले. ‘अम्मा का टिफीन’, ‘अम्मा की पढ़ाई’, ‘अम्मा की दुकान’, आदींचा त्यात समावेश आहे.
मात्र आता आमदार जोरगेवार यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावे ‘अम्मा चौक’ तयार करण्याचा आणि तिथं पुतळा बसवण्याचा आग्रह काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून धरला. महापालिकेने स्थायी समितीत ‘अम्मा चौक’ निर्मितीचा ठरावही घेतला. ‘अम्मा’ यांचा नियोजित पुतळा आणि गांधीजींचा पुतळा यांच्यातील अंतर शंभर मीटरपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या चौकाला गांधी चौक देखील बोलले जायचे.
या जागी पुतळा नव्हे, तर शिल्पचित्र तयार केले जाणार होते, असे महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांचे म्हणणे आहे. परंतु चौकात महापालिकेकडून सुरू करण्यात आलेले बांधकामाची रचना पाहाता, तिथं अर्धाकृती पुतळा बसला जाईल, असे बांधकाम होते.
आमदार जोरगेवार यांचा हा छुपा अजेंड्यावर काँग्रेस आक्रमक झाली. गांधी चौकाचे नाव बदलणार म्हणून काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले. परंतु आता गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेले चंद्रपूरचे सुपुत्र बाबुराव थोरात यांचा पुत्र विजयने या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे.
विजय थोरात म्हणाले, "माझे वडील बाबुराव गोवा मुक्ती संग्रामात शहीद झाले. त्यांच्या स्मृती चंद्रपुरात जपल्या जाव्यात यासाठी त्यांचे नाव एखाद्या चौकाला, बगीचाला किंवा मार्गाला द्यावे, अशी वारंवार मागणी महापालिकेकडे केली. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले". पण आमदार जोरगेवार यांच्या आईच्या नावे चौक बहाल करण्यात महापालिका तत्परता दाखवत आहे. हे सर्व आमदार जोरगेवार यांच्या अट्टाहासपोटी असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
देशासाठी बलिदान देणाऱ्या एका शहिदाला सन्मान देण्यात कुचराई करणाऱ्या महापालिकेने आमदाराच्या आईचे नाव चौकाला देण्यात एवढी तत्परता का दाखवत आहे? केवळ त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या आई आहेत, म्हणून महापालिका झुकली का? आमदाराच्या अम्माचे, असे कोणते महान कार्य आहे? बलिदानापेक्षा मोठे आहे का? असे सवाल विजय थोरात यांनी केले. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली असून शहिदांचा अवमान करू नका, अशी विनंती केली आहे. या प्रकारामुळे आमदार जोरगेवार समाज माध्यमांवर चांगलेच ट्रोल होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.