

Nagpur News : चंद्रपूर महापालिकेचा निकाल जाहीर होताच खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना पळवायचे कारण काय असा सवाल उपस्थित करून खासदारांनी वडेट्टीवार यांच्या निष्ठेवर शंका घेतली असल्याने हा वाद आता प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचला आहे. यावेळी खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार चंद्रपूर शहरात गरजेपेक्षा जास्त लुडबूड करीत असल्याचा आरोपही केला.
वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात लोकसभेच्या निवडणुकीत टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. वडेट्टीवारांनी धानोरकर यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवला होता. दुसरीकडे धानोरकर यांनी काहीही झाले तरी मी लढणार असे सांगून त्यांना खुले आव्हान दिले होते. निवडून आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी वडेट्टीवारांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात जाऊन बाहेरचे लोक आपल्यावर राज्य करीत आहेत असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. हा वाद दिल्लीत पोहोचला होता.
दोन्ही निवडणुका आटोपल्यानंतर हा वाद क्षमला असे दिसत होते. मात्र आता पुन्हा चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा दोघांमधील वाद उफाळून आला आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी सात नगरसेवकांची गरज आहे. उद्धव ठाकरे सेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११ नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. यातच विजय वडेट्टीवारांनी काही नगरसेवकांना नागपूरमध्ये आणल्याने काँग्रस नेत्यांमध्येच आणखीच वाद उफाळून आला आहे.
या प्रकाराने खासदार धानोरकर चांगल्याच चिडल्या आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार आहे. त्यामुळे त्यांना लपून ठेवण्याची गरज नाही. वडेट्टीवार हे राज्याचे नेते आहेत. मात्र ते गरजेपेक्षा जास्त चंद्रपूर शहरात लुडबूड करातात. हे असेच सुरू राहिले तर मलाही त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात जावे लागले असा इशारा त्यांनी दिला आहे. मी या सर्व प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याही कानावर हा प्रकार घातला आहे.
उद्या बुधवारी (ता.21) ते चंद्रपूरला येणार आहेत. त्यानंतर मला काय करायचे याचा निर्णय मी घेईल. मला न विचारता वडेट्टीवारांनी नगरसेवकांना लपवले. याची सुरुवात त्यांनीच केली. त्यामुळे त्यांच्यासोबत आता बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तसाही त्यांचा चंद्रपूर महापालिकेशी काही संबंध नाही. त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही चंद्रपूर महापालिका येत नाही. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्षाचे नगरसेवक आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचा दावाही प्रतिभा धानोरकर यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.