

Chandrapur Mahapalika Election 2025: चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसला केवळ अडीच वर्षे सत्ता मिळाली. उर्वरित काळात भाजपकडे मनपाची सूत्र होती. मात्र या दहा वर्षांच्या काळात राजकीय समीकरण बदलली आहे. काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया वेगळी चुल मांडत तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाने टोक गाठले आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार एकत्र आले आहे.
भाजपमध्ये दुफळी आणि काँग्रेसमध्ये एकीचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील १० नगर पालिका आणि एका नगर पंचायतीचा निकाल येत्या २१ डिसेंबरला घोषित होईल. या निकालाचे थेट पडसाद चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीवर उमटणार आहे. विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरी वगळता उर्वरित पाच विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या वाट्याला पराभव आला. त्यामुळे या पालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट नेमका किती राहील, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
सध्या तरी एकमेकांना पाण्यात बघणारे खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार एकत्र आले, हे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरले आहे. मात्र या उत्साहावर २१ तारखेच्या निकालाचा परिणाम होवू शकतो, अशी शक्यता आहे. दुसरीकडे चंद्रपूर मनपाची निवडणूक आजवर नेहमी भाजप नेते तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याभोवती केंद्रीत असायची. तिकीट वाटप त्यांच्याच सल्याने व्हायचे. यात थोडी माजी मंत्री हंसराज अहीर यांच्याही भूमिका असायची.
२०१९ नंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. चंद्रपूर विधानसभेत भाजपकडून आमदार किशोर जोरगेवार निवडून आले. मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे जोरगेवार, अहीर असा गट शहरात तयार झाला. मुनगंटीवारांची अनेक माणसं जोरगेवारांच्या खेम्यात दाखल झाली आहे. त्यामुळे यावेळी तिकीट वाटपात भाजपात तीन केंद्र असतील. त्यात कुणाच्या वाट्याला नेमका किती वाटा येईल, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.
चंद्रपूर शहर हा जोरगेवारांचा मतदार संघ. त्यांच्याकडे या महापालिकेची सूत्र देण्यात आली आहेत. त्यांना भाजपची सत्ता आणून वरिष्ठ नेत्यांना आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवायची आहे. त्यासाठी मुनगंटीवारांचे गृह शहर. आजवर तिकीट वाटपापासून प्रचारापर्यंत सगळीकडे त्यांचेच वर्चस्व राहीले आहे. यंदा मात्र आपल्या समर्थकांसाठी तिकीट वाटपात त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पण जास्तीत जास्त समर्थकांना तिकीट मिळवून देऊन त्यांना शहरावरचे वर्चस्व कायम ठेवायचे आहे.
तिसऱ्या बाजूला हंसराज अहीर यांचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपदी अलिकडेच गेले. त्यामुळे त्यांनाही राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. त्यांच्या निकटवर्तीयांना तिकट मिळवून देण्यासाठी त्यांना जोरगेवार यांचे उंबरठे झिजवावे लागू शकतात. एकूणच भाजपात तिकीट वाटपावरून प्रचंड रणकंदन होईल, अशी स्थिती आहे.
दुसरीकडे महानगर पालिका स्थापनेच्या पहिल्या निवडणुकीची काँग्रेसची सूत्र सांभाळणारे नरेश पुगलिया आता वेगळी चुल मांडायच्या तयारीत आहेत. शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत त्यांची आघाडी संदर्भात चर्चाही झाली आहे. काँग्रेस आणि भाजपमधील तिकीट न मिळालेले उमेदवार या आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादी (शरद), शिवसेना (उबाठा), वंचित आघाडी काँग्रेस आघाडीत जाण्यासाठी धडपडत आहे.
थोडक्यात येत्या काही दिवसात उपरोक्त परिस्थिती मोठे फेरबदल होईल. दिवसागणिक चित्र आणि युती-आघाडीतील मित्र बदलत जाईल असेच चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.