
Nagpur, 14 March : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तशा काही घडामोडीही घडत आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले जयंत पाटील हे भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा होत आहे. मात्र, भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या राजारामबापू इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचं आणि जिम्नॅशियमचं उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. एरवी जयंत पाटील यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार कायम असायचे. पण, पाटील यांच्या इस्लामपूरमध्ये पवारांना प्रथमच कार्यक्रम होत होता, त्यामुळे त्याची राज्यात चर्चा रंगली होती.
शक्तीपीठ महामार्गाला (Shaktipeet Highway) विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे परवा मुंबईत आंदोलन झाले. त्यात आंदोलनात बोलताना जयंत पाटील यांनी काहींसे सूचक विधान केले होते. ‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही’ असे विधान माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. त्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यामुळे पाटील यांना त्याबाबत तातडीने खुलासा करण्याची वेळ आली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी नव्या आणि सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्या तरुणाला संधी द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार आणि काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनीही त्याला उत्तर देत आव्हान दिले होते. त्यामुळे त्या बैठकीत चांगलीच नोकझोक झाली होती.
एकंदरितच जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. त्याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याएवढा मी मोठा नाही. काही कपोलकल्पित बातम्या चालत असतात. पण स्वतः जयंत पाटील हे आजपर्यंत तरी या विषयावर कोणशी बोलले असतील, असे मला वाटत नाही.
जयंत पाटील यांच्याशी माझी अनेकदा चर्चा झाली आहे. पण राजकीय विषयावर कधीही चर्चा झाली नाही. त्यांचं एक वेगळं नेतृत्व आहे. त्यांचा एक वेगळा विचार ते करू शकतात. पण, आज तरी जयंत पाटील यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा ह्या केवळ अफवा दिसत आहेत, असा दावा राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.