
Nagpur News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे भुजबळांनी वारंवार तीव्र नाराज बोलून दाखवली होती. याचवेळी त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातूनही काढता पाय घेतला होता. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. याबाबत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोठा खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी आग्रही होते हे खरे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा प्रयत्न केले. असे असले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झालो आहे. मी भाजपचा मंत्री नाही असे स्पष्ट करून त्यांनी टीका करणाऱ्यालाही उत्तर दिले.
शिवसेनेत असतानाही आपण मंत्री होतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही मंत्रिमंडळात होतो. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातही मंत्री होतो याकडे लक्ष वेधून त्यांनी भाजपसोबत (BJP) नसताना आणि असतानाही आपण मंत्री होतो असे सूचित केले. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनाही यावेळी त्यांनी चोख उत्तर दिले.
माझ्या विरोधातील केस संपली आहे. कोर्टाने 80 पानांचे जजमेंट देऊन मला आरोपातून मुक्त केले आहे. ज्या कंत्राटदाराने दिल्लीत फाईफ स्टार महाराष्ट्र सदन बांधले त्याला एक पैसाही सरकारने दिला नाही. त्याने मुंबईतील आरटीओचे फाईव्ह स्टार ऑफीस बांधले, गेस्ट हाऊस आणि काही अधिकाऱ्यांची घरे बांधून दिली आहेत. त्याचेही पैसे त्याला देण्यात आले नाही.
त्यामुळे कोर्टाने भ्रष्टाचार झाला, पैशाची देवाण घेवाण झाल्याचे आढळले नसल्याचे निरीक्षण नोंदवून माझ्या विरोधातील केस बरखास्त केली आहे. यानंतरही अनेक लोक टीकाटीपणी करतात त्यांना मला हे सांगायचे असल्याचे भुजबळ म्हणाले.
नाशिकचा पालकमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार महायुती सरकारला आहे. मला यात फारसे स्वारस्य नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहो. काही जागांवर मात्र थोडेफार बदल होऊ शकतात. मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे धनंजय मुंडे यांची नाराजी स्वाभाविक आहे. तो मनुष्याचा स्वभाव असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात यंदा पहिल्यांदा भुजबळ यांना वगळण्यात आले होते. त्याचा आवर्जून उल्लेख करत "देर आये, दुरुस्त आये" असे भुजबळ म्हणाले. तसेच एखादे घर बांधायला घेतल्यावर विविध लोक विविध जबाबदाऱ्या पार पडतात. कोणी गवंडी होतो, कोणी सुतार होतो. तसेच मी देखील पक्ष बांधणीत योगदान दिलेले आहे. मधल्या काळात ज्या घडामोडी झाल्या त्यात मात्र काही दुःख वाट्याला आल्याचंही त्यांनी म्हटलं.
मी पक्ष उभारणीसाठी मनापासून आणि प्रदीर्घकाळ काम केलेले आहे. विविध टप्प्यांवर माझे योगदान आहे. त्यामुळे मंत्रीपदाची संधी हुकल्यावर दुःख होणारच. मात्र, जे सतत घरे बदलतात. आज एका घरात, उद्या दुसऱ्या घरात. सतत नव्या घरात घरोबा करतात. त्यांना आमचे दुःख कळणार नाही, असा उपरोधिक टोला विविध पक्ष बदललेल्या कृषिमंत्री कोकाटे यांचे नाव न घेता भुजबळ यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.