Akola News, 11 Nov : भाजपचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मंगळवारी अकोला शहरात येत आहेत. शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे.
मागील काळात दंगल झालेल्या अकोला (Akola) शहरातील हिंदूं मतांना एकत्र आणण्यासाठी योगी यांची सभा यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 3 लाख 50 हजार 725 मतदार आहेत. मागील 30 वर्षांत या मतदारसंघात भाजपला कधीच धक्का बसला नाही. प्रत्येक निवडणुकीत भाजपचा उमेदवार ताकदीने विजयी झाला आहे.
याआधी माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझहर हुसेन आणि अरुण दिवेकर अशा दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. 2019 साली दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे 2593 मतांनी विजयी झाले होते. त्यांनंतर भाजपने (BJP) माजी महापौर विजय अग्रवाल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र, आता भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध असून या विरोधाचे रुपांतर बंडखोरीत झालं आहे. यंदा या मतदारसंघात भाजपच्या दोन नेत्यांनी बंडखोरी केली आहे.
माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, भाजप नेते अशोक ओळंबे, माजी महापौर अश्विनी हातवळणे यांच्यासह 25 जण या मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपने विजय अग्रवाल यांनाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे भाजपचे सगळे इच्छुक नाराज झाले आहेत. हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपली उमेदवारी देखील कायम ठेवली आहे. शिवाय त्यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिली आहे.
अशोक ओळंबे यांनी देखील भाजपला रामराम करत प्रहार पक्षात प्रवेश असून ते परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) पक्षाचे बंडखोर राजेश मिश्रा हे देखील निवडणूक लढवत आहेत. मिश्रा, अलीमचंदानी आणि ओळंबे यांच्याकडे हिंदू चेहरा म्हणून पाहिलं जातं.
या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची मोठी संख्या आहे. काँग्रेसने इथे साजिद खान पठाण हा मुस्लिम चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. माजी राज्यमंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र झिशान हे काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांची उमेदवारी नाकरल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील मुस्लिम मतदानाचं विभाजन हाईल आणि त्याचा फायदा भाजपला होणार असल्याची चर्चा रंगली होती.
त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झिशान यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारच नाही. अशा परिस्थितीत बंडखोर उमेदवारांमुळे हिंदू मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या सभेत या मतदारसंघातील दंगलीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
शिवाय हिंदू (Hindu) मतांचं होणारं विभाजन होऊ नये यासाठी योगी काय बोलणार आणि त्यांची सभा हिंदू मतांचं विभाजन रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडं वंचित बहुजन आघाडीची 20 हजार मतं निर्णायक ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.