

Congress Confidence Booster Dose : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय खेचून आणत आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. पदवीधर मतदारसंघाची एक टर्म सहा वर्षांची असल्याने, या सलग दुसऱ्या विजयामुळे वंजारी यांना सलग १२ वर्षांची टर्म मिळाली. जिल्ह्याच्या आणि विदर्भाच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये वंजारी यांनी मिळवलेला हा विजय काँग्रेससाठी केवळ एक जागा नसून भविष्यातील मोठ्या राजकीय डावपेचांसाठी एक हुकुमाचा एक्का ठरू शकणार आहे.
जिल्ह्याच्या काँग्रेसकडे सध्या आमदार विकास ठाकरे, डॉ. नितीन राऊत यांच्यासारखे अनुभवी नेते आणि श्यामकुमार बर्वे यांच्या रूपाने खासदार अशी फळी आहे. या यादीत माजी मंत्री सुनील केदार हे सर्वाधिक भक्कम आधार आणि वजनदार नेते मानले जातात. मात्र, न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर त्यांचे ‘हात’ बांधले गेले आहेत. त्यातच केदार यांच्या राजकीय वर्चस्वाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याने केदार यांचा हा गड ढासळला. अशा कठीण परिस्थितीत काँग्रेसला अभिजित वंजारी यांच्या रुपाने मिळालेला विजय पक्षाला उभारी देणारा ठरला आहे.
सध्या देशभरात आणि राज्यात विविध प्रश्नांवरून युवकांची आंदोलने सुरू असल्याने सत्ताधारी भाजपसमोर अडचणी उभ्या आहेत. पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण वर्ग वंजारी यांच्या पाठीशी असल्याचे दुसऱ्या पसंतीच्या मतांमधून स्पष्ट झाले आहे. सलग दोन विजयांमुळे पक्षातील वंजारींचे राजकीय वजन केवळ नागपूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भात विस्तारू शकते. त्यामुळे भविष्यात काँग्रेसला संघर्षासाठी सक्षम चेहरा मैदानात उतरवायचा असल्यास वंजारी हे विधानसभाच नव्हे, तर लोकसभेच्या उमेदवारीसाठीही पक्षांतर्गत अत्यंत प्रभावी पर्याय ठरू शकतील, यात शंका नाही.
जातीय समीकरणांचा विचार करता अभिजित वंजारी यांच्या रूपाने काँग्रेसला अखेर तेली समाजातील एक मातब्बर चेहरा गवसला आहे. नागपूर आणि लगतच्या विदर्भातील हा समाज पारंपरिकरित्या भाजपची हक्काची मतपेढी म्हणून ओळखला जातो. शिवाय, वंजारी यांची ओळख एका सुशिक्षित आणि निष्कलंक अशी आहे. त्यांची संस्थानिक कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने समाजात त्यांचा स्वतंत्र प्रभाव आणि प्रतिष्ठा आहे. ही बाब जमेची ठरणारी आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या पारंपरिक तेली समाजाची मते काँग्रेसकडे वळवण्यासाठी वंजारी हे पक्षाचा ‘हुकमी एक्का’ सिद्ध होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.