Nagpur : "विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची ओरड भाजपकडून केली जाते. विदर्भाचा पुळका दाखविणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेतेच सध्या सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे," असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी लगावला.
काँग्रेस आणि इतर पक्ष विदर्भावर अन्याय करतात, असा आरोप सातत्याने भाजप करीत असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपुरात किती दिवस हिवाळी अधिवेशन चालले. विदर्भाचे किती प्रश्न मार्गी लागले. आताही देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन घ्यायला भाग पाडावं. सध्या सरकारने हिवाळी अधिवेशनाचे कच्चे वेळापत्रक जाहीर केलं आहे.
केवळ दहा दिवसांचं अधिवेशन होणार आहे, असं समजते. त्यामुळे विदर्भाकडे कोण पाठ फिरवत आहे, असा प्रश्नही आमदार पटोले यांनी उपस्थित केला. भाजप नेहमीच खोटं बोलत आली आहे. रामाच्या नावावर पैसा गोळा केला. गंगा माता म्हणत गंगेचे पाणी विकले. विदर्भावर अन्यायाच्या नावाखाली आकांडतांडव केला. आता हेच लोक सत्तेत आहेत. त्यामुळे दोन महिने चालेल, असे अधिवेशन सरकार का घेत नाही, अशी हिंमत का दाखवीत नाही, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. पवित्र पोर्टल कुणी सुरू केलं हे त्यांनी सांगावं. आता तरुणाईचा विरोध वाढला म्हणून कंत्राटीचा जीआर रद्द करावा लागला. खरं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार फडणवीसांवर भारी पडत आहेत, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
ललित पाटील या ड्रग्जमाफियामागे कुणाचा हात आहे, हे शोधण्याची गरज आहे. आपल्याला पळविण्यात आलं असं तो स्वत: सांगत आहे. त्यामुळे त्याला इतके दिवस रुग्णालयात ठेवणे, नंतर पळायला मदत करणे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. काँग्रेसनेच नाशिक बचाव आंदोलन केले. त्यानंतर सरकारनं तीन सदस्यीय समिती नेमली. या प्रकरणात आमच्याकडेही नावं आहेत. ती विधिमंडळात देऊ, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले की, हिवाळी अधिवेशनापर्यंत वेळकाढूपणा सुरू राहणार आहे.अधिवेशनाच्या काळात काय होतं, हे पाहण्यासारखं ठरणार आहे. न्यायालय सातत्याने सुनावणीबाबत ताशेरे ओढत आहे. त्यानंतरही टाइमपास केला जातोय. विधानसभा अध्यक्षांनी नियमाप्रमाणे कारवाई करणे अपेक्षित आहे, असं आमदार पटोले यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.