हिंगण्यात काँग्रेसची ‘पुष्पा फिल्डिंग’; भाजपला टक्कर देण्यासाठी नवा प्रयोग...

मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी मागील दोन वर्षापासून या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी मतदारसंघात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे सुरू केले.
Ramesh Bang, Sunil Kedar and Sameer Methe
Ramesh Bang, Sunil Kedar and Sameer MetheSarkarnama
Published on
Updated on

हिंगणा : हिंगणा विधानसभा क्षेत्रात मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. नेमकी हीच बाब हेरून काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘पुष्पा फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. भाजप आमदार समीर मेघे यांना टक्कर देण्यासाठी नवा प्रयोग हिंगणा विधानसभा क्षेत्रात राबविण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून ही फिल्डींग लावली जात असल्याचे विश्‍वसनीय सूत्र सांगतात.

हिंगणा विधानसभा क्षेत्र काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. या गटाचे सर सेनापती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते. ग्रामीण राजकारणावर त्यांची पकड आजही कायम आहे. आजही हिंगणा विधानसभा क्षेत्रात त्यांच्यासारखा अनुभवी राजकारणी नेता नाही. या मतदारसंघात भाजप आमदार विजय पाटील घोडमारे यांनी पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून हा गड सर केला होता. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ऐनवेळी समीर मेघे (Sameer Meghe) यांना भाजपची उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना माजी आमदार विजय घोडमारे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे सांगण्यात आले होते.

भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे कुठलेही राजकीय पुनर्वसन केले नाही. शेवटी भाजप आमदार समीर मेघे व माजी आमदार विजय घोडमारे यांच्यात बिनसले. यानंतर घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाताला बांधले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली. मात्र भाजप आमदार समीर मेघे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी आपले पुत्र दिनेश बंग यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरविले. त्यांची जिल्हा परिषद सदस्य पदी वर्णी लावली. मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगली भूमिका बजावली.

काँग्रेसचे नेते पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी मागील दोन वर्षापासून या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी मतदारसंघात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे सुरू केले. सद्यःस्थितीत मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांची अप्रत्यक्षपणे न दिसणारी फौज तैनात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना गोळा करण्याची मोहीम राबविली जात आहे. यामुळे हिंगणा विधानसभा क्षेत्रात दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्याने काँग्रेस पक्षाला या मतदार संघात संधी मिळावी, यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मधल्या काळात पक्षातील निर्णयामुळे काही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व कार्यकर्त्यांची वज्रमूठ बांधण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे.

Ramesh Bang, Sunil Kedar and Sameer Methe
सुनील केदार म्हणाले, जे राज्यात होऊ शकले नाही, ते नागपुरात घडले...

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेसची सरशी करण्यामध्ये नामदार केदार यांचा सिंहाचा वाटा आहे. याची जाणीव काँग्रेस पक्षातील हायकमांडला आहे. ही वस्तुस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदार संघावर कॉंग्रेस दावा करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आमदार समीर मेघे यांनी आपली पकड मतदार संघावर सात वर्षात मजबूत केली आहे. महाविकास आघाडी सरकार मागील दोन वर्षांपासून हिंगणा विधानसभा क्षेत्राला विकास निधी देताना अन्याय करीत असल्याची ओरड सुरू आहे. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांचा निधी सरकारने परत घेतला. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील तीन वर्षही विकास कामे होणे शक्य नाही.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजप आमदार समीर मेघे यांनी हिंगणा येथे आंदोलन करून महाराष्ट्रात सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. ही बाबसुद्धा त्यांना विकास कामाचा निधी आणताना मारक ठरली आहे. सरकारने या मतदारसंघात विकास कामासाठी निधी देताना अडवणुकीची भूमिका घेतली आहे. विकास कामे झाले नाही तर जनताही भाजप पासून दुरावेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सुनील केदार यांनी या मतदार संघावर काँग्रेसची ‘पुष्पा फिल्डिंग’ सुरू केली आहे. या फिल्डिंग दरम्यान आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे काँग्रेसची पुष्पा फील्डिंग आगामी काळात कोणत्या पक्षाला घाम फोडते, हे येणारा काळच सांगेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com