Dy. Chairperson In Action : भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी येथील मंडईत तरुणीनं पूर्ण विवस्त्र होत केलेल्या नृत्य प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभाती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली. यासंदर्भात त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे व भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची बैठक घेतली. ‘सरकारनामा’ने भंडाऱ्यातील हा प्रकार सर्वांत प्रथम उघडकीस आणला होता.
पोलिस महानिरीक्षकांशी डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी याबाबत फोनवर चर्चा केली होती. मंगळवारी (ता. 28) डॉ. गोऱ्हे यांनी नागपूर येथील रविभवनात दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (Deputy Chairperson Of Maharashtra Legislative Council Neelam Gorhe Ordered To Form Committee Of Special DIG To Stop Dance Program & Cases Like Women's Trafficking In Bhandara)
खडीगंमत, मंडई आदीसारख्या आयोजनातून महिलांचे शोषण होत आहे. यासाठी आंतरराज्य मानव तस्करीवर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी व दोन आठवड्यांत त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. भंडारा जिल्ह्यातील दोन मंडईंमध्ये आपत्तीजनक प्रकार घडला होता. एका आयोजनात पंचायत समिती सभापतीनं नृत्यांगनेवर पैसे उडविले होते, तर नाकाडोंगरी येथे तरुणींने विवस्त्र नृत्य केलं होतं.
महिलांवर पैसे उधळणे, त्यांचे विवस्त्र नृत्य घडवून आणणे या घटना अत्यंत गंभीर आहेत. यासाठी परराज्यातूनही तरुणींना आणलं जातंय, अशा तक्रारी आहेत. अशा कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परवानगी देताना अत्यंत कडक अटी व शर्ती घालण्यात याव्यात, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. जे नियमांचे उल्लंघन करीत आहेत, त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करा, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ओडिशा, छत्तीसगड आदी राज्यांतून अल्पवयीन मुलींना लावणीच्या नावाखाली आणलं जातंय. प्रत्यक्षात अशा कार्यक्रमांना परराज्यांतून मुली आणताना संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यात आली की नाही, ही बाब अत्यंत गंभीरपणे तपासली गेली पाहिजे. आंतरराज्य मानव तस्करीचाच हा प्रकार आहे. राज्यात अशा आयोजनांसाठी होत असलेल्या आंतरराज्य मानव तस्करीवर प्रतिबंध आणावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. प्रसंगी अशा गुन्ह्यांबाबत डान्सबारविरोधी कायाद्यातील विविध कलमांचा वापर करावा, असे त्या म्हणाल्या.
विशेष पोलिस निरिक्षक छेरींग दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी. त्यात विधी तज्ज्ञ, पोलिस अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत. 15 दिवसांत समितीनं काम सुरू करीत अहवाल द्यावा, असंही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. अशा कार्यक्रमांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिस विभागानं करावं, अल्पवयीन मुली असतील अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे आयोजनास परवानगी देताना सर्व नियम तपासावे, महिला दक्षता समिती व गाव पातळीवर महिला समित्यांची अशा आयोजनापूर्वी मतं जाणून घ्यावी, असंही त्या म्हणाल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.