Devendra Fadnavis on Mahavikas Aghadi : 'मला असं वाटतं की ही जी मालवणची घटना झालेली आहे आणि ज्याप्रकारे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे. यावर कुणीच राजकारण करू नये असं माझं मत आहे.' असं म्हणत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर सुरू असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर तर दिलंच. शिवाय, यावेळी बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर टीकाही केली.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'पहिल्यांदा तर निश्चितपणे ही घटना आपल्या सगळ्यांना कमीपणा आणणारी घटना आहे. अतिशय दु:खद घटना आहे. पण त्याचवेळी अशाप्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहीजे. कोण दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहीजे. या तिन्ही गोष्टींची कारवाई सुरू आहे.'
शिवाय 'नौदलाने ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली असल्याने, चौकशी समितीही तयार केलेली आहे. टीम तयार केली, ती टीम त्या ठिकाणी येवून गेली आहे. त्यामुळे नौदल यासंदर्भात चौकशी करून उचीत कारवाई करेल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल. घटनेसाठी कोणती गोष्टी जबाबदारी होती किंवा काय त्यामध्ये चुका राहिल्या आहेत. या संदर्भातील तो रिपोर्ट असणार आहे.' असंही फडणवीसांनी सांगितलं.
तसेच 'आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने एक पोलीस तक्रार केली आहे. एफआयआर नोंदवलेला आहे. त्यामुळे त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर नौदलाच्या रिपोर्टनंतर पोलिस विभाग देखील कारवाई करेल. त्यामुळे सगळ्याप्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे.' अशी माहिती फडणवीसांनी दिली.
याशिवाय 'मुख्यमंत्र्यांनी(CM Shinde) सुद्धा सांगितलेलं आहे की, आपण नौदलाला मदत करून, त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी एक भव्य अशाप्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत. त्यामुळे या दृष्टीने ही घटना झाल्यानंतर जेजे करणं आवश्यक आहे. ते केलं जात आहे, नौदलाकडूनही केलं जात आहे. मात्र त्याचवेळी केवळ याचं राजकारण करायचं, हे जे काही विरोधकांनी सुरू केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला निवडणुकांच्या चष्म्यातून पाहायचं. हे अत्यंत चुकीचं आहे. अशाप्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये.' असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
पुढे फडणवीस म्हणाले, 'मी एवढचं सांगतो राज्य सरकारत, नौदल असेल सगळ्यांनी एकत्रित येवून ज्या काही चुका घडलेल्या आहेत. त्या चुका पुन्हा घडणार नाहीत. ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी उभा राहील. यासंदर्भातील कारवाई सुरू केलेली आहे.' तसेच, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मुद्दाम असं केलं जात आहे का? अशी विचारणा होताच फडणवीस म्हणाले, 'आता कोणी काय केलं हे मी बोलणार नाही. सगळ्यांनाच माझी विनंती पण आहे आणि सूचना पण आहे. या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.