
Nagpur News: दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना राजकीय पुनर्वसनासाठी पुन्हा एक संधी चालून आली असल्याचे दिसते. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून त्यांचे तिकीट पक्के असे मानले जात आहे. मात्र, हा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला राहिलेला नाही. याशिवाय नितीन गडकरींचा आणि आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात विभागलेल्या भाजपची त्यांना कितपत साथ मिळते यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.
चांगला परफॉर्म आणि लोकप्रियता असताना दक्षिण नागपूरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट अचानक कापण्यात आले होते. त्यांच्याऐवजी आमदार मोहन मते यांना तिकीट देण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीसाठी राजकीय गेम केल्याचा आरोप कोहळे यांनी सहा वर्षांपूर्वी केला होता. त्यांच्यावर गडकरींचे समर्थक असाही ठप्पा लागला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्या तिकीट भाजपने कापल्या होत्या, त्यात कोहळे यांचाही समावेश होते.
बड्या नेत्यांमुळे त्यांच्या नावाची फराशी राजकीय चर्चा झाली नव्हती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने शिक्षक आमदार निवडणुकीत त्यांचे नाव पुढे केले होते. त्यावेळीसुद्धा त्यांना भाजपच्याच काही नेत्यांनी विरोध केला होता. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे राजकीय पुनर्वसन आणि ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कोहळे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
नागपूर शहरातून त्यांना ग्रामीणमध्ये नेले. जिल्हाध्यक्ष केले. यावेळी त्यांना सावनेर किंवा काटोल विधानसभा मतदारसंघाचा चॉईस देण्यात आला होता. मात्र त्यांनी तिकीट द्यायचे तर दक्षिण नागपूरचेच द्या अशी अट घातली होती असा दावा केला जात आहे. तत्पूर्वी विधान परिषदेच्यावेळी त्यांचे नाव चर्चेत आले होते. या सर्व घडामोडी सुरू असताना 2024 ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर अचानक त्यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपने दिली. ती त्यांनी स्वीकारलीसुद्धा.
काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना कडवी झुंज दिली. मात्र, अवघ्या दहा हजाराच्या फरकाने कोहळे पराभूत झाले. त्यामुळे त्यांचा आता क्लेम संपला असे सांगण्यात येत होते. मात्र, आता पदवीधरासाठी विचार केला जात असल्याने कोहळे यांच्या आशी पुन्हा उंचावल्या आहेत. नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची गादी माजी आमदार अनिल सोले यांनी समर्थपणे सांभाळली होती. मात्र, तरुणतुर्कांना संधी देण्यासाठी त्यांचेही तिकीट कापण्यात आले होते. माजी महापौर व विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांना भाजपने संधी दिली होती. निवडणूक जाहीर झाली तेव्हा महाविकास आघाडीचे राज्यात सरकार होते.
महाविकास आघाडीने अभिजित वंजारी यांना मैदानात उतरवले होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री नको याकरिता महाविकास आघाडी स्थापन झाली होती. याशिवाय गडकरी यांचे समर्थक असलेले माजी आमदार अनिल सोले यांचे तिकीट कापल्याने भाजपमध्येही मोठा असंतोष निर्माण झाला होता.
एवढेच नव्हे तर बावनकुळे हेसुद्धा त्यावेळी रिकामे होते. फडणवीस हे ओबीसींच्या विरोधात आहे असे वातावरण तापवण्यात विरोधकांना यश आले होते. यात जोशी पराभूत झाले आणि वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.
राज्यात आता फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीची सत्ता आहे. सर्वाधिकार फडणवीस यांच्याकडे आहेत. हे बघता कोहळे यांना सहजासहजी तिकीट मिळेल याची शाश्वती देता नाही असे काही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ओबीसी कार्ड खेळण्याशिवाय भाजपसमोर दुसरा पर्याय नाही असेही बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.