
Nagpur News : विधानसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर महायुतीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. भाजपसह शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील इनकमिंगही जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला घरघर लागली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तर आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता असून अनेकजणांचं तळ्यात मळ्यात आहे. अशातच आता काँग्रेसला (Congress) त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा झटका बसला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचेच लक्ष आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे. राज्यातील भाजप (BJP) ,काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. याचदरम्यान, विदर्भात काँग्रेसला सहा प्रमुख पदाधिकार्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
पुढील काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला नागपूरमध्ये मोठं खिंडार पडल्याचं दिसून येत आहे.उमरेड पंचायत समितीच्या सभापती गीतांजली नागभीडकर, उपसभापती सुरेश लेंडे, पंचायत समिती सदस्य दादाराव मांडसकर,प्रियंका लोखंडे, भिवापूर पंचायत समितीचे उपसभापती राहूल मसराम,याचसोबत उमरेड बाजार समितीचे संचालक भिकाजी भोयर यांनी भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांनी या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश करुन घेत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. या सर्वमंडळींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. या सर्वप्रमुख नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस नागपूर ग्रामीणमध्ये भगदाड पडलं आहे.
आगामी काळात होत असलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाला सोबत घेऊन लढायची, याबाबत महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं आपलं धोरण निश्चित केलेलं नाही. यातच महायुतीसोबत की स्वबळ याबाबतचा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे. तर मविआत दुसरीकडे काँग्रेसने अद्याप याबाबत अजून स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत बोलणी सुरू असली तरी मुंबई वगळता इतर ठिकाणी काँग्रस महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येते.नागपूरमध्ये मागील निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून आला होता. काँग्रेसलासुद्धा फक्त 29 जागांवर समाधान मानावे लागले होते. असे असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि उत्तर नागपूरमधून माजी मंत्री नितीन राऊत निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेला वीस वर्षांत पक्ष वाढवता आला नाही. नगरसेवकांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. महापालिकेत त्यांना सोबत घेतल्यास काँग्रेसची संख्यासुद्धा घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शहरातील सर्व 150 जागा काँग्रेसने लढवाव्यात, आघाडीच्या भानगडीत पडू नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.