Akola News : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत धुसफूस सुरु आहे. आता तर काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांपुढेच जिल्हाध्यक्षांच्या तक्रारी मांडल्यामुळे पक्षांतर्गत राजकारण तापलं आहे. काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांनी जिल्हा नेतृत्वाच्या विरोधात अकोट येथील बैठकीतून एल्गार पुकारला होता.
तर दुसरी बैठक बार्शीटाकळी तालुक्यात महान येथे रविवारी पार पडली. या बैठकीत पक्ष निरीक्षकांपुढेच जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीसंदर्भात काही नेत्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे आता या नेत्यांच्या नाराजीचा सूर थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत पक्ष निरीक्षक पोहोचविणार असल्याने यावर पक्षातील वरिष्ठ काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीचा सूर उमटत आहे. आता या नाराजीचा विस्फोट अकोटमधील बैठकीत झाला. दोन वेळा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले हिदायत पटेल यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अकोटात घडवून आणलेला नाराज नेत्यांचा मेळावा रविवारी पुन्हा महान येथे जमला होता.
नाराजांच्या या मेळाव्यात पक्ष निरीक्षक श्यामबाबू उमाळकर यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमधील पक्षांतर्गत धुसफूस आता थेट प्रदेश स्तरापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत पक्ष निरीक्षकांनी सर्व नेत्यांची बाजू ऐकून घेतली. त्यामुळे आता पक्षातील वरिष्ठ यावर काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
जिल्ह्यातील नेतृत्व बदलाची मागणी ?
अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत धुसफूस सुरु आहे. आताही काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीबाबत दुसऱ्यांदा नाराजीचा सूर आवळला. पण थेट प्रदेशकडे तक्रार करण्याची कुणाचीही तयारी नाही.
नेतृत्व बदलाबाबतचा विषयाला फाटा देत पक्ष निरीक्षकांपुढे जिल्हाध्यक्षांनी त्यांची कार्यप्रणाली बदलावी, असा सूर नाराज बैठकीत उमटला. मात्र, काही तालुका अध्यक्षांनी थेट मुद्याला हात घालत जिल्ह्यातील नेतृत्व बदलाची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
नाराजीच्या तक्रारी थेट प्रदेशाध्यक्षांकडे जाणार ?
जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस आणि नेत्यांच्या नाराजीवरून दोन गट पडल्याचे चित्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष निरीक्षक श्यामबाबू उमाळकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आता 'तलाठ्यां'ची बाजू थेट प्रदेशाध्यक्षांकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन नेते बैठकीपासून दोन पावले दूर ?
अकोटमधील बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांपैकी काही ज्येष्ठ नेत्यांनी महान येथील बैठकीकडे पाठ फिरवली. बैठकीसाठी खास निमंत्रित केलेल्या दोन नेत्यांनीही बैठकीपासून दोन पावले दूर राहण्याचा निर्णय घेतला. यात एका डॉक्टर नेत्यासह प्रदेश कार्याकारिणीतील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे.
Edited by - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.