
Nagpur, 07 April : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवनंतर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. मात्र, विधानसभेतील पराभवास अनेक प्रस्थापित नेते, पदाधिकारी तसेच गटबाजीसुद्धा तेवढीच जबाबदार आहेत. त्यामुळे तातडीने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करावी आणि यापुढे प्रस्थापितांकडे जिल्ह्याचे नेतृत्व देऊ नये, अशी मागणी विदर्भ, मराठवाड्यातील काँग्रेसच्या असंतुष्ट गटामार्फत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), माजी अध्यक्ष सोनिया गांधी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे आणि अन्य प्रमुख नेत्यांनाही उपरोक्त निवेदन पाठविण्यात आले आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ‘लेटर वॉर’ रंगण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाने नुकतेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्लीत बोलावले होते. पक्षबांधणी आणि पक्षाची नव्याने वाटचाल कशी राहील, याची माहिती दिली. अहमदाबाद येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर संघटना, कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात येत असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
कार्यकारिणी निवडीचे अधिकारसुद्धा जिल्हाध्यक्षांना दिला जाणार आहेत. यात प्रस्तापित नेत्यांचा हस्तक्षेप व शिफारशी खपवून घेतल्या जाणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. असे असले तरी गटबाजी कशी संपणार, याची चिंता अनेकांना सतावते आहे.
प्रस्थापितांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षांची माळ टाकल्यास पुन्हा गटबाजी होईल आणि विशिष्ट लोकांचेच कार्यकारिणीत वर्चस्व राहील, असा धोकाही वर्तविला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गटबाजीची झळ बसलेल्या कार्यकर्त्यांनी पत्र लिहून मल्लिकार्जुन खरगे यांच्या याकडे लक्ष वेधले आहे.
यासोबतच काही सूचना देखील केल्या आहेत. यात त्यांनी विदर्भ विभागीय कार्याध्यक्षांची निवड करताना पश्चिम विदर्भातील ज्येष्ठ नेत्यांना पूर्व आणि पूर्वमधील नेत्यांना पश्चिम विदर्भात संधी द्यावी. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माउंट अबू येथे झालेल्या अधिवेशनातील ठराव व निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला परत केरळमध्ये सक्रिय होत आहेत. याबाबतही तातडीने निर्णय घेऊन योग्य नेतृत्व दिल्यास त्याचा लाभ आगामी काळात होऊ शकतो. नजिकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात यावे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता आल्यास भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल, असेही प्रदेश सचिव आर. एम. खान नायडू, डॉ. मोहम्मद नदीम, कार्यकारिणी सदस्य प्रकाश मुगदिया, अब्दुल जब्बार, डॉ. मोहन देशमुख, आर.आर. खडके, इकराम हुसेन ॲड. माजीद कुरेशी, सीमा येरपुडे, प्रकाश इटनकर, प्रल्हाद ठाकरे, प्रभाकर पवार, विलास भालेकर, हेमू चंदेले आदींनी नमूद केले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.