Yavatmal and Washim District Political News : शिवसेनेमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नव्हती. तेव्हा यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांतील बंजारा समाज हा शिवसेनेसोबत होता, पण शिंदेंसोबत यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-दिग्रसचे आमदार संजय राठोड उद्धव ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडले. तेव्हापासून बंजारा समाज कुणाला कौल देणार, याचे उत्तर नेत्यांना सापडेनासे झाले आहे. (The leaders have not been able to find the answer to whom the Banjara community will vote)
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे नेते हजेरी लावत आहेत. बंजारा समाजाने आजवर भाजपला साथ दिलेली नाही. आता देवेंद्र फडणवीस स्वतः बंजारा समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी सरसावले आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे संजय राठोडसुद्धा आहे. त्यामुळे बंजारा भाजपकडे वळेल, असे भाकीत वर्तवले जात आहे; पण समाजाचा कल कुणाकडे आहे, याचे ठोस उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही.
काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. तेथून ते थेट पोहरादेवी येथे दर्शनाला गेले होते. आता ओबीसी जागर यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज (ता. १३) दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत दाखल झाले.
फडणवीसांनी पोहरादेवीचे दर्शनही घेतले. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीत कार्यक्रम ठेवून आगामी लोकसभेत बंजारा समाजाची मते खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेना पक्ष फुटण्याअगोदर यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांतील बहुतांश बंजारा समाज बांधव शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजूने होते.
शिवसेनेसोबत बंजारा समाजाची बांधिलकी बघून पुढाकार घेत मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी संस्थानचा मोठा विकास केला. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता मात्र बंजारा समाजही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. मंत्री राठोड हे शिवसेना शिंदे गटात, तर महंत सुनील महाराज हे उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. याउलट यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत.
गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही भाजपला बंजारा बांधवांची मते खेचता आली नाहीत. शिवाय हरिभाऊ राठोड यांनी केव्हाच भाजपला राम राम ठोकला. त्यामुळे बंजारा समाजाचा एकही नेता भाजपकडे नव्हता. परिणामी पुसदच्या नाईकांच्या घरात खिंडार पाडत भाजपने ॲड. नीलय नाईकांना आपल्याकडे ओढले. नव्हे तर बंजारा समाज बांधवांचे लक्ष्य वेधण्यासाठी नीलय नाईकांना विधान परिषदेत पाठवत आमदारही केले.
आज ओबीसी जागर यात्रेचा समारोपीय कार्यक्रम पोहरादेवीत ठेवला गेला. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्यात आली. बंजारा समाज बांधवांची मते खेचण्यासाठीच हा कार्यक्रम पोहरादेवीत ठेवल्याची चर्चा या वेळी मंदिराच्या परिसरात होती. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत दाखल झाल्याने बंजारा समाज बांधव आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल देतो, ही येणारी वेळच सांगेल.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.