
Gadchiroli : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. त्यामुळे वर्षभरापासून महायुतीत शांतता असली तरी आता सहपालकमंत्री यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी थेटे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे नाव घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.
गडचिरोली जिल्हा स्टील सिटी करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याकरिता या जिल्ह्याचे पालकत्व त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले. दैनंदिन शासकीय कामकाजाच्या सोयीसाठी त्यांनी शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत तेच गडचिरोली जिल्ह्याचा कारभार सांभाळतात. हे बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खटकत आहे. धर्मरावबाबा आत्राम गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यास इच्छुक होते.
महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते अन्न नागरी पुरवठा मंत्री होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरीचे पालकत्व आपल्याकडे ठेवून घेतले होते. त्यामुळे बाबा आत्राम यांना शेजारच्या गोंदिया जिल्याचे पालकमंत्री करण्यात आले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल असल्याने आत्रम यांच्यावर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. त्यांनी कार्यकाळ संपायच्या आधीच पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. महायुती सरकारची सत्ता आल्यानंतर बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले होते.
अजित दादा पुन्हा मंत्रिमंडळात आपला समवेश करतील अशी शंभर टक्के आशा त्यांना होती. मात्र दादांनी त्यांना अडीच वर्षे प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पालकमंत्रीपदावरचा दावाही त्यांना गमावावा लागला. वर्षभरापासून संयम बाळगून असलेल्या बाबा यांची अस्वस्थता वाढत चालली असल्याचे आता दिसू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि निधीवाटपावरून त्यांनी आता सहपालकमंत्री यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांमध्ये सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांचा हस्तक्षेप वाढल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आत्राम यांनी जयस्वाल यांच्यावर केवळ विकासकामांमध्येच नव्हे, तर अधिकाऱ्यांवरही दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विकासकामातील निधी आणि अधिकार यावरून शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात हा संघर्ष विकोपाला गेला असून या अंतर्गत वादामुळे महायुतीच्या समन्वयाच्या वातावरणालाच फटाके लागत असल्याचे दिसून येत आहे. जयस्वाल सहपालकमंत्री असले तरी त्यांनी इतरांच्या विधानसभा क्षेत्रात लुडबूड करणे योग्य नाही.
आपणसुद्धा मंत्रिपद सांभाळले आहे. भविष्यात पुन्हा मंत्री झालो आणि त्यांच्या विधानसभा क्षेत्रात हस्तक्षेप केला तर त्यांना चालेल का, असा सवालही आत्राम यांनी केला आहे. आपल्या मतदार संघातही अधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेची कामे सांगितल्यावर ते सहपालकमंत्र्यांचे नाव पुढे करतात. सहपालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेत विकासकामे करायला हवी. मात्र मागील काही काळापासून त्यांचा अहेरी विधानसभा क्षेत्रात हस्तक्षेप वाढला आहे. जिल्हा नियोजन, खनिज निधीच्या वितरणापासून विकासकामांच्या वाटपापर्यंत त्यांचा हस्तक्षेप जाणवत आहे, असेही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे.