Gadchiroli Dharmaraobaba Atram News : गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आढावा बैठका घेत आहेत. काल (ता. २०) जिल्ह्यातील कुरखेडा येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी वीज विभागाचा मुद्दा समोर आला अन् नेमकी याचवेळी ‘बत्ती गूल’ झाली. सतत अर्धा तास विद्युत पुरवठा खंडित असल्याने मंत्रिमहोदय कमालीचे संतापले. (The minister was extremely angry as the power supply was interrupted for half an hour)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले अन् अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली. बऱ्याच वर्षांनंतर त्यांना मंत्रिपद मिळाल्याने सध्या ते जाम खूष आहेत. त्यांच्यातील उत्साह कमालीचा वाढला आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा वेग प्रचंड वाढला आहे.
कुरखेड्यात १३२ केव्ही वीजपुरवठ्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले. विदर्भातील प्रमुख चेहरा म्हणून आमदार धर्मरावबाबांना अजित पवार यांनी थेट बढती दिली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.
त्यांच्याकडे अन्न औषध प्रशासन विभाग आहे. बऱ्याच वर्षांच्या काळानंतर थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने बाबा जाम खूष आहेत. विदर्भात पक्ष मजबूत करण्याकरिता ते रोजच्या रोज दौरे करीत आहेत. विशेष करून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. काल त्यांनी जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी नागरिकांच्या विविध समस्या समोर आल्याने या बैठकीचे रूपांतर जनता दरबारात झाले.
या वेळी उपविभागांतर्गत येणारे अनेक विषय समोर आले. उपविभागात विद्युत पुरवठ्याची मोठी समस्या आहे. या समस्येवर चर्चा सुरू झाली. अन् याचवेळी बत्ती गूल झाली. या प्रकारामुळे मंत्रिमहोदयांनी प्रचंड संताप व्यक्त केला. कुरखेड्याला १३२ केव्ही विद्युत पुरवठ्याची गरज असल्याचे समजल्यानंतर त्यांनी मंत्रालय स्तरावरून या समस्येचा मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा कायापालट करणार असल्याचे आत्राम म्हणाले. या वेळी उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे, आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार हरिराम वरखडे, तहसीलदार राजकुमार धनबाते, गटविकास अधिकारी धीरज पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे उपस्थित होते.
कामचुकारपणा कराल तर खबरदार...
गडचिरोली जिल्ह्याला विकासाकरिता मोठी चालना मिळू शकते. त्यासाठी प्रशासनाची सकारात्मकता महत्त्वाची आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक अधिकारी नागपुरात बसून कारभार चालवितात. अनेक जण तर महिनोमहिने कर्तव्यावर जात नाहीत. आता मात्र असले प्रकार चालणार नाहीत. गुणवत्तापूर्ण व कर्तव्यदक्षतेने काम केले नाही तर अधिकारी कर्मचा-यांवर फौजदारी कारवाई करण्यासोबतच अॅट्ाॅ सिटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला.
तातडीने निकाली काढली समस्या...
आढावा बैठक सुरू असताना अरततोंडी शिरपूर येथील विद्यार्थ्यांनी एसटी बसची समस्या मांडली. विद्यार्थिसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. बस मात्र एकच आहे. त्यामुळे अनेकांना १७ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मरावबाबांनी आगार व्यवस्थापनाला निर्देश देत ही समस्या तत्काळ सोडवली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.