नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर सतीश होले यांनी आज भाजपला जबर धक्का देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपसह इतरांच्याही भुवया उंचावल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होले यांनी आज कॉंग्रेसचा हात धरला. त्यानंतर आगे आगे देखो होता है क्या, अशी बोलकी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली.
शहरातील सोमवारी क्वार्टरमधील एका उद्यानात हा पक्षप्रवेशाचा सोहळा थोड्या वेळापूर्वी पार पडला. याबाबत नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता, ही तर आता सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या.. यापुढे नागपूरकरांना (Nagpur) भाजपमधील मोठमोठ्या नेत्यांचे कॉंग्रेस (Congress) प्रवेश बघायला मिळतील. याचे कारण म्हणजे भाजपने (BJP) नागपूरकरांनी दिलेली आश्वासने तर पूर्ण केलीच नाहीत, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांना दिलेले शब्ददेखील पाळले नाहीत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आता त्यांच्यावर चिडलेले आहेत आणि ही चीड महानगपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बघायला मिळणार आहे, असे ते म्हणाले.
भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नागपूरकरांवर आर्थिक बोझा बसवला. मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांच्या कामात जनतेच्या पैशाची लूट केली. भाजपने ठरवून हे पाप केले आहे. आता सच्चा कॉंग्रेसी विचारांचा माणूस कॉंग्रेसकडे वळला आहे. सतीश होले ही तर फक्त सुरुवात आहे. यापुढे भाजपचे अनेक मोठे नेते कॉंग्रेसमध्ये आलेले दिसतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर याच्या दौऱ्याबाबत विचारले असता, मला स्वतःला केसीआर यांचा कॉल आला होता. मला ते भेटू इच्छित होते. पण मी दौऱ्यावर असल्यामुळे भेट शक्य झाली नाही. भाजपची सत्ता देशातून घालवायची असेल तर आपण एकत्र आले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे आणि आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असे नाना म्हणाले.
राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल यांचे मकोकाच्या आरोपीसोबत संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्वाला धोटे यांनी काल पत्रपरिषेद केला. याबाबत विचारले असता, ज्या पद्धतीने आरोप लावले गेले. त्याची वस्तुस्थिती तपासून बघावी लागेल. मगच त्यावर काही प्रतिक्रिया देता येईल. आरोप लावणाऱ्यांना काय आहे. आजकाल काय कुणीही डिजिटल कारागिरी करून फोटो व्हिडिओ तयार करू शकतो. आरोप लावणाऱ्यांनी तर मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले असल्याचेही सांगितले होते. मग ते बंगले गायब झाले, असे सांगत त्यांनी नाव न घेता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले गायब कसे झाले, याचे उत्तर आजी त्यांच्याकडे नाही. आरोप कुणी लावला भाग नाही. आज महाराष्ट्रात भाजप महाविकास आघाडीवर रोज आरोप करत आहे. पण एकाही आरोपाची सत्यता पुढे आली नाही. या आरोपांच्या फेऱ्यांमुळे महाराष्ट्राची सरकार आणि महाराष्ट्र बदनाम होत आहे. आरोप सोप्या पद्धतीने लावले जातात. आरोप हे महाराष्ट्रात काही नवीन राहिलेले नाही. सुशांत सिंह प्रकरणातही तेच झाले. कोरोनाच्या काळात लोक भयभीत झाले होते. पण भाजपवाले तेव्हाही सरकारवर आरोप करण्यातच धन्यता मानत होते. संस्कृतीचा मोठा वारसा असलेल्या महाराष्ट्रात, असे होऊ नये. महाराष्ट्राची बदनामी कुठेतरी थांबली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
एसटी कामगार इतक्या दिवसांपासून न्यायासाठी लढत आहे. कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रात त्यांचा प्रश्न मोठा आहे. केवळ १५-१६ हजार रुपयांत त्यांनी कसे भागवावे, हा प्रश्न आहे. भाजपनेही त्यांना भडकावले आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडले. सरकारने आंदोलकांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, ही आमची मागणी आहे. शिवीगाळ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, परंपरा नाही. मागे मी एका गावगुंडाबद्दल बोललो, तर त्याचा संबंध थेट पंतप्रधानांशी जोडला गेला. आम्ही शेवटपर्यंत गावगुंडाबद्दलच बोलत होतो. पण आमचे पुतळे जाळण्यात आले, हेसुद्धा कुठेतरी थांबले पाहिजे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.