Marathi Non Marathi Issue : पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण, प्रांतवाद, भाषावाद , जातनिहाय आरक्षण असं सगळे विषय गौण आहेत असं केवळ सांगण्यात येतं. परंतु आडनाव, त्यातून कळणारी जात आणि प्रांतवाद, भाषावाद आजही कायम असल्याचं जिवंत उदाहरण विदर्भातील अमरावती येथे बघायला मिळतंय. या सर्व प्रकारांना कंटाळलेल्या एका हॉटेल मालकानं आपण परप्रांतीय नाही, तर महाराष्ट्रीयन आहोत, याचा पुरावा देणारं भलमोठं फ्लेक्स बॅनरच लाऊन टाकलंय.
आगळ्यावेगळ्या पद्धतीचं हे बॅनर लागल्यानंतर या हॉटेल मालकानं वारंवार जात, प्रांत आणि भाषावाद करणाऱ्यांना न बोलता जबर चपराक लगावलीय. (Hotel Owner From Amravati Displayed His Proof Of Cast & Birth Place On Large Flex Banner)
सनी शेट्टी असं हे फ्लेक्स बॅनर लावणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. सनी यांचं अमरावती बडनेरा मार्गावर हॉटेल आहे. हॉटेलमध्ये येणारे अनेक जण त्यांना शेट्टी या आडनावावरून विचारणा करतात. ‘तुम्ही आंध्र प्रदेशचे आहात काय?.. तुमचा जन्म कुठे झाला?.. शेट्टी कोणत्या जातीत येतात?’ अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर रोजच होते. हॉटेलमधल्या जेवणाबद्दल ‘फीडबॅक’ देण्याऐवजी लोक या भलत्याच चर्चा करीत बसतात. त्यातून अनेकदा लोकांच्या चर्चा भरकटतातही.
शेट्टी आडनाव मराठीत आहे काय?, मराठी-अमराठी, महाराष्ट्रीयन, कुणबी, पाटील, मराठा, कोळी, कोष्टी, एससी, एसटी, एनटी, ओबीसी, ब्राह्मण, तेलुगु, कोमटी अशा अनेक चर्चांचा शेट्टी यांना दररोज सामना करावा लागतो. कधी कधी या चर्चा त्यांच्यासाठी त्रासदायकही ठरतात. दररोजच्या या चर्चा थांबविण्यासाठी सनी शेट्टी यांना काय करावं, हा प्रश्न पडला होता. त्यातून त्यांना एक आगळीवेगळी युक्ती सुचली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सनी यांनी आपला फोटो, जन्माचा सरकारी दाखला घेतला व एक भलमोठं फ्लेक्स बॅनर तयार करून घेतलं. बॅनर तयार झाल्यानंतर त्यांनी श्रमिकांच्या मदतीनं ते मोठ्या फ्रेमवर चिटकविलं आणि अमरावती बडनेरा मार्गावरील आपल्या हॉटेल बाहेरच लाऊन टाकलं. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला अगदी दुरूही त्यावरील सर्व तपशील वाचता यावा, एवढ्या ठळक स्वरूपात सनी यांनी आपला जन्म तारखेचा दाखला फ्लेक्सवर ठेवला आहे. त्यावर प्रश्न पडणाऱ्यांना सणसणीत उत्तरं देणारी सर्वच माहिती आहे. हॉटेलजवळून जाणारा प्रत्येक व्यक्ती काही क्षण थांबत हा काय प्रकार आहे, हे वाचल्याशिवाय पुढं जात नाही.
सनी शेट्टी या तरुणानं अमरावती बडनेरा मार्गावर दोन वर्षांपूर्वी आपलं हॉटेल सुरू केलं होतं. ते चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. शेट्टी आडनावावरून ते परप्रांतीय असावेत, अशी नेहमीच चर्चा होते. आडनावावरून त्यांची जातही शोधण्याचा प्रयत्न होतो. त्यावर त्यांनी काढलेला हा तोडगा सध्या चांगलाच चर्चेत आलाय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.