
Nagpur News : ठाकरे सरकारपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांना दातात धरलेल्या माजी मंत्री बच्चू कडूंच्या डोक्यातून अजूनही अजितदादांवरचा राग उतरलेला नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येऊन उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या अजितदादांबाबत कुठच्या ना कुठच्या गोष्टी उकरून काढत, बच्चूभाऊ त्यांच्यावर तोफ डागत असतात.
जुन्या सरकारमधील निधी वाटपाचा मुद्दा तापवून बच्चूभाऊंनी शिवसेनेतील बंडाचे खापरही अजितदादांवर फोडले. नव्या सरकारमधील अजितदादांच्या प्रवेशावरही बच्चूभाऊंनी अनेकदा संशयाने पाहिले. हेच बच्चूभाऊ आता अजित पवार मुख्यमंत्री झाले; तर वाटोळे होईल, असे सांगून मोकळे झाले. मुख्यमंत्रीपदापर्यंत जाण्याच्या अजितदादांच्या मार्गात काटे टाकण्याची एकही संधी बच्चूभाऊ सोडत नाहीत. (Latest Political News)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. यातच पुण्यातील दोन्ही पवारांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानाने राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी भाजपने शरद पवारांना सोबत घेऊन येण्याची अट ठेवल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला. यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाल्याच्या चर्चांना बळ मिळाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडून अजित पवार गट आणि बच्चूभाऊंमध्ये भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बच्चू कडू म्हणाले, शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत आले आहेत. भाजपसोबत कुणीही नव्हते त्यावेळी शिंदेंनी त्यांना रिस्क घेऊन साथ दिली. अजित पवार आता मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा अजितदादांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलून मुख्यमंत्री केले तर वाटोळे होईल. याचे भाजपला खूप मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच कडूंनी दिला आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने आधीच नाराज असलेल्या कडूंनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुण्यातील दोन्ही पवारांच्या बैठकीमुळे उठलेले संभ्रमाचे वादळ काही केल्या शमताना दिसत नाही. यावर बोलताना कडू म्हणाले, "काका-पुतण्याच्या भेटीवरून संभ्रमित होण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हीही तेच करत असतो. शरद पवारांच्या मनात काय सुरू आहे, हे आजपर्यंत कुणालाही ओळखता आलेले नाही. राष्ट्रवादीवर कुरघुडी करण्यासाठी भाजपने खेळलेली खेली शरद पवारच उलटवण्याची शक्यता आहे", असेही कडू यावेळी म्हणाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.