Farmers Protest : पीकविम्याची रक्कम तिजोरीतून आणत शेतकऱ्यांचं हटके आंदोलन!

Crop Insurance Amount : मिळालेल्या रकमेच्या संरक्षणासाठी सशस्त्र पोलिसांचीही केली मागणी, जाणून घ्या किती आहे रक्कम?
Farmers Protest
Farmers ProtestSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News : अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना पीकविमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना 35, 50 आणि 90 रुपये नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याकडे सरकारसुद्धा दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी यवतमाळ येथे गुरुवारी अनोखं आंदोलन केलं.

थेट तिजोरीसह शेतकरी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकले. त्यांनी विम्याच्या रकमेसाठी सशस्त्र संरक्षण देण्याची मागणी केली. या आंदोलनाने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Farmers Protest
Nagpur Winter Session 2024 : कार्यालय नसलं तर पायऱ्यांवर बसू; पण जनतेचे प्रश्न मांडू...

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज सादर केला. या अर्जामध्ये मौजा शिवणी (ता. घाटंजी, जि. यवतमाळ) येथील रहिवासी शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने शेतकऱ्यांना 52 रुपये 99 पैसे इतक्या रकमेचा पीकविमा मंजूर केला.

बँकेतून ही रक्कम पिशवी अथवा सुटकेसमधून नेणे शक्य नसल्याने रक्कम नेण्यासाठी वडिलोपार्जित तिजोरी व बैलगाडी आणली आहे. रुपये 52.99 इतक्या मोठ्या रकमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेतांना रस्त्यात लूटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर पीकविम्याच्या रकमेवर आहे, असं संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

52.99 रुपयांची एवढी मोठी रक्कम घरी नेताना पोलिसांनी पीकविमा रकमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलिस पुरवावेत, अशी उपरोधिक मागणी शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. मोर्चात देवानंद पवार, शैलेष इंगोले, अशोक भुतडा, प्रा. विठ्ठल आडे, संजय डंभारे, उमेश इंगळे, बंडू जाधव, घनश्याम अत्रे, संगीत काळे, रामधन राठोड, रामचंद्र राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Farmers Protest
Tanaji Sawant : ''माझ्यासाठी तो किरकोळ...'' ; संजय राऊतांच्या आरोपांवर तानाजी सावंतांचं विधान!

विमा दिला की भीक? -

जिल्ह्यातील आठ लाख 44 हजार शेतकऱ्यांनी 509 कोटींचा विमा हप्ता भरला होता. यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तीन हजार 177 कोटी रुपये नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटी 10 लाख रुपयेच दिले.

जवळपास आठ लाख शेतकरी विम्याच्या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. दुसरीकडे ज्यांना भरपाई मिळाली त्यात अनेकांना पाच-पन्नास रुपये देऊन त्यांची थट्टा करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला, की भीक हे आता स्पष्ट करावे, असा संताप शेतकरी नेते देवानंद पवार यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com