Wardha News : राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारने विधान भवनात कार्यालय नाकारलं असलं तरी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसू; पण जनतेचे प्रश्न ताकदीने मांडू, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं. वर्धा येथे ते बोलत होते.
आम्ही लाखो लोकांना भेटलो, हजारो लोकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. समस्या अनुभवण्यासाठी आम्ही 700 किलोमीटर चाललो. आतापर्यंत बेरोजगारीचा सर्वांत मोठा मुद्दा पुढे आला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. अवकाळी पावसामुळे दुबार संकट शेतकऱ्यांवर आले आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक अडचणी सोसाव्या लागत आहेत. हे सर्व मुद्दे घेऊन अधिवेशनात जात आहे, असे त्यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने कार्यालयाचा ताबा घेतला आहे. अजित दादा मित्र मंडळ जे आहे, त्यातले अनेक नेते विचार सोडून सत्तेत गेले आहेत. सत्तेचे अतिक्रमण त्यांनी केले आहे. स्वतःच्या हितासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या ऑफिसवरही अतिक्रमण केलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. आम्ही प्रयत्न करत राहू; पण सरकारने दाद दिली नाही तर आम्ही रस्त्यावर बसू, विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसू, नाहीतर सभागृहात बोलू, पण सामान्य लोकांची बाजू मांडूच, असे ते म्हणाले.
सत्तेत असलेले अहंकारी लोक आपापल्या हिताच्या फाइल्स घेऊन विधान भवनात बसतील. तो त्यांचा मुद्दा आहे. पण जोपर्यंत सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही लढत राहू. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. यावर आमदार रोहित पवार म्हणाले, आतापर्यंत पाच लाख कोटींची गुंतवणूक असलेले उद्योग गुजरातला गेले आहेत. हे सर्व उद्योग महाराष्ट्राच्या हक्काचे होते. भाजपचे जे सरकार सत्तेवर आहे, ते महाराष्ट्राचं हित जपायला तयार नाही. हे सरकार महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठी आलेले आहे. गुजरातला ताकद देण्यासाठी आलेले आहे. गुजरातला मोठं करण्याची सुपारी भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे आणि अधिकची भर एकनाथ शिंदे तसेच अजितदादा मित्र मंडळाने घातली आहे, असं रोहित पवार म्हणाले.
पेपरफुटीवर, स्पर्धा परीक्षेचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एखादं बिल येईल असं वाटत होतं, परंतु भाजपकडे कॅसिनोचा अनुभव असलेली मोठी लोकं आहेत. त्यामुळे कदाचित पहिलं बिल त्यांनी कॅसिनोचं आणलं असावं, असा टोलाही आमदार पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार देणार, की 50 हजार हे सांगायला सरकारजवळ वेळ नाही. युवकांच्या हिताचे एखादे धोरण न राबविता सरकारने कॅसिनोचं बिल आणलं, अशी टीकाही आमदार पवार यांनी केली. हे सरकार सामान्यांच्या हिताचे सरकार अजिबात नाही, असेही रोहित पवार या वेळी म्हणाले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.