Karnatak Government : कोरेगाव भीमा -एल्गार परिषद प्रकरणात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 14 एप्रिल 2020 मध्ये अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारने यंदाचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. 10 लाख रुपये रोख, शाल-श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बुधवारी (ता. 31) तेलतुंबडे यांना बेंगळुरू येथील जे.सी. मार्गावर असलेल्या रवींद्र कलाक्षेत्र येथे हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आनंद तेलतुंबडे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कर्नाटक सरकारकडून एन. जी. महादेवाप्पा, भानू मुश्ताक, एच. एस. मुक्त्याक्का. ना. डिसुजा, जीनादत्त देसाई, गुजरातच्या गांधी सेवाश्रम यांनाही या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे तेलतुंबडे यांचे मेहुणे आहेत. आनंद हे भारतीय कम्युनिस्ट पक्षचे (माओवादी) केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचे मोठे भाऊ आहेत. आनंद तेलतुंबडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. नागपूरमधील सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. काही काळ त्यांनी नोकरी केली. त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
आयआयएम अहमदाबादमध्ये त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचाही त्यात समावेश आहे. आयआयटी खरगपूरलाही त्यांनी अध्यापन केले. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक पदावर कामाचाही त्यांना अनुभव आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्सचे (टीपीडीआर) सरचिटणीस, अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य पदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. तेलतुंबडे यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याचे अनेक लेख व शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत.
पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भिमा येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने या कारवाईला स्थगित करण्याचा आदेश दिला. हे प्रकरण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच न्यायालयापर्यंत गेले. एनआयएने प्रा. तेलतुंबडे यांना अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये (UAPA) अटक केली होती.
आनंद यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने म्हटले होते की, राष्ट्रीय तपास यंत्रणेला तेलतुंबडे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी फक्त आक्षेपार्ह संघटनांशी संबंध दाखवता आले आहेत. अशा गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा 10 वर्षे आहे. तेलतुंबडे 2 वर्षे तुरुंगात होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांना जामीन देण्यासाठी ही योग्य केस आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आनंद तेलतुंबडे यांच्यावर अन्याय झाल्याची टीका ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही व्यक्त केली होती. आता कनार्टक सरकारने त्यांना बहुमान दिल्याने सामाजिक कार्याच्या चळवळीचा बहुमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.