
Nagpur News : मनोज जरांगे यांच्या मागणीवरून हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा-कुणबी अशी नोंद आढळल्यास त्याला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता सर्वच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असा दावा जरांगे यांच्यावतीने केला जात आहे. दुसरीकडे शासनाने काढलेला जीआर हे फक्त माहिती पत्रक असल्याचाही दावा केला जात आहे. यावरून सर्वत्र संभ्रम निर्माण झाला असताना राज्याचे महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने आणखीच गोंधळ निर्माण झाला आहे.
कोणी नोंद शोधली म्हणून त्या आधारावर सर्टिफिकेट मिळणार नाही, असे विधान बावनकुळे यांनी केले आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे आणि ओबीसीचे आंदोलन, राज्य शासनाने काढलेला जीआर, मुख्यमंत्र्यांनी ओबसींना दिलेले आश्वासन, छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली नाराजी, आदी मुद्द्यांवर बावनकुळे यांनी भाष्ट केले आहे.
बावनकुळे म्हणाले, कोणी जुन्या दस्तावेजामध्ये नोंदणी शोधली म्हणून त्या आधारावर सर्टिफिकेट मिळणार नाही, अधिकारी हे सर्व कागदपत्रे तपासतील, नियमाप्रमाणे स्वाक्षरी करतील, एवढेच नव्हे तर कुठल्याही जात प्रमाणपत्राला आव्हान देता येऊ शकते, असेही ते म्हणाले. छगन भुजबळ हे नाराज नाहीत. त्यांचे काही आक्षेप आणि संभ्रम आहेत. ते आम्ही दूर करू. त्यांचा आक्षेप नेमक्या कुठल्या शब्दावर हे तपासून घेतले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
ओबीसीची उपसमितीचे सर्व सदस्यांची बैठक मंगळवारी आणि बुधवारी घेण्यात येईल. यावेळी व्यापक चर्चा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. जरांगे यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्रे देण्याची मागणी केली आहे. असे असताना ओबीसी समितीत एकही कुणबी समाजाचा प्रतिनिधी नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर बावनकुळे यांनी उपसमिती कॅबिनेट मंत्र्याची असल्याचे स्पष्ट केले.
ओबीसीमध्ये 353 जाती आणि 12 बलुतेदार आहेत. ही समिती कुठल्या एका जातीची नाही. आम्ही सर्व एक आहोत आणि एकदिलाने ओबीसीच्या हितासाठी काम करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका सांगितली आहे. कुठल्याही समाजाचे आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला दिले नाही. काही जण सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी संभ्रम निर्माण करीत आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी-मराठा अशी नोंद असलेल्यांना जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पुरावे असल्याशिवाय कोणालाही जात प्रमाणपत्र मिळणार नाही. याबाबत फार संभ्रम कोणी ठेवू नये अरे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.