Nagpur News : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय विजयगड बंगला येथे सज्ज झाले आहे. नागपूर जिल्हा परिषदेसमोरील सिव्हिल लाइन्स परिसरात असलेल्या रविभवनजवळ हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. या कार्यालयासाठी वेगळा विशेष कार्य अधिकारी (OSD) नेमण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते.
हिवाळी अधिवेशन संपल्यांनतर काही दिवसांतच नागपूर येथे दादांचे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नागपुरातील दादांच्या कार्यालयाशी संबंधित सर्व कामे यादव हे पार पाडणार आहेत.
नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिकस्तरावरच मार्गी लागावीत, त्यांना मुंबईत चकरा मारण्याचे काम पडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. नागपूरमधील नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या, प्रश्न सोडविण्याबरोबरच, मंत्रालयाशी संबंधित वित्त व नियोजन विभागाची कामे उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत आता केली जाणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी सचिन यादव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर येथे अधिवेशनकाळात मुक्कामी असताना दादांनी अनेक जिल्ह्यांना भेट दिली. त्यावेळी त्यांना अनेकांनी मंत्रालयाशी संबंधित कामांसाठी सातत्याने मुंबईला चकरा माराव्या लागत असल्याचे लक्षात आणून दिले होते. त्यामुळे विदर्भातील अमरावती व नागपूर विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली होती.
नागपूर येथे असलेल्या कार्यालयातून आता विदर्भातील 11 जिल्ह्यांचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नागपूर येथील कार्यालयात नेमण्यात आलेले दादांचे ओएसडी यादव यांचा संपर्क क्रमांकही उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सार्वजनिक करण्यात आला आहे. याशिवाय लवकरच या कार्यालयाचा ई-मेल आयडीही स्वतंत्रपणे सुरू केला जाणार आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना त्यावर आपल्या कामांशी संबंधित संपर्क करता येणार आहे.
Eidted by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.