Aditi Tatkare : भंडारा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे यांना शनिवारी (ता. 23) त्यांचा अतिउत्साह आणि कार्यक्रमाच्या नियोजनाला अगदी ‘कॅज्युअली’ घेणे चांगलेच भोवले. मोहाडित आयोजित सरपंच मेळाव्याला गर्दी जमलीच नाही. अशात आमदार कारेमोरे कोणताही अंदाज न घेता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना घेऊन नियोजित वेळी कार्यक्रमस्थळी पोहोचले. रिकाम्या खुर्च्या व हॉल पाहून तटकरे मात्र चांगल्याच नाराज झाल्या. सकाळी 11.45 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र दुपारी दीडपर्यंत कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी आयोजकांची कसरत सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत वादात असतात. अलीकडेच त्यांच्याविरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी असभ्य वागणूक दिल्याचा आरोप केला होता. अशातच आमदार कारेमोरे यांचे नाव शनिवारी पुन्हा चर्चेत आहे.
आमदार कारेमोरे यांनी मोहाडी येथे सरपंच मेळावा आयोजित केला होता. या वेळाव्याला संबोधित करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांना येथे आमंत्रित करण्यात आले होते. नियोजित वेळेनुसार आमदार कारेमोरे तटकरे यांच्यासह सकाळी 11:40 वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी तेथे फारसे लोक नव्हते. प्रांगणात टाकलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. तटकरे यांना वाटले की हॉलमध्ये बऱ्यापैकी सरपंच जमले असतील. अशात हॉलमध्ये आल्यावर तर त्यांना अधिकच धक्का बसला.
हॉलमध्ये पाच ते सहा वगळता उर्वरित सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन नव्हते. निवेदिकेने माइकवरून मंत्री तटकरे कार्यक्रमस्थळी आल्याची घोषणा केली खरी परंतु तटकरे प्रवेश द्वाराजवळच थांबल्या. त्यांनी आमदार राजू कारेमोरे यांना बोलावून घेतले व हा काय प्रकार आहे, याचा जाब विचारला. मंत्र्यांसमोर झालेल्या या फिजितीमुळे कारेमोरे चांगलेच गोरेमोरे झालेत. त्यांनी स्वत: व कार्यकर्त्यांची मदत घेत गर्दी जमविण्यासाठी फोनाफोनी सुरू केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सकाळी पावणेबारा वाजतापासून गर्दी जमविण्याची ही कसरत सुरू होती. दुसरी दीड वाजताच्या सुमारास गर्दी जमली. तटकरे यांना ढोलताशांच्या गजरात कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. मात्र हॉलमध्ये आल्यानंतर तटकरे यांचा भ्रमनिरास झाला. कार्यक्रम सुरू असताना टप्प्याटप्प्याने गर्दी जमत होती, परंतु या गर्दीत किती सरपंच होते, हा भाग निराळा.
सरपंच मेळाव्यात झालेल्या या ‘पुअर शो’मुळे मंत्री अदिती तटकरे यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्टपणे दिसत होते. त्यांचे हे भाव भाषणादरम्यान शब्दातून काहीसे प्रकट झालेत. आमदार राजू कारेमोरे हे गेल्या निवडणुकीतील 8 हजार मतांच्या फरकाने विजयी झालेत. आगामी निवडणुकीत हा फरक 80 हजारांचा असावा असे तटकरे म्हणाल्या. परंतु 80 हजारांचे हे ‘टार्गेट’ कसे गाठणार, असा प्रश्न करीत त्यांनी कारेमोरे यांना टोला लगावलाच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.