
Gondiya News : गोंदियाच्या दौऱ्यावर जात असताना भाजपचे आमदार परिणय फुके याच्या वाहनातील ताफ्याने एका दुचाकीस्वारास धडक दिली. यात तो जागीच गतप्राण झाला. मृताच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत फुके रुग्णालयात येत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत मृताच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी घेऊन रुग्णालयाच्या दारासमोरच ठिय्या मांडला. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) शनिवारी ताफ्यासह गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात गोरेगावकडून गोंदियाच्या दिशेने येत होते. गोंदिया-कोहमारा राज्य महामार्गावर दुचाकीने जात असलेल्या अरविंद चव्हाण याच्या गाडीला ताफ्यातील (एमएच 35 ए. आर. 2159) या वाहनाने जोरदार धडक दिली.
यात दुचाकीचालक अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही बाब समजताच जिल्हा सामान्य रुग्णालयात मृताचे कुटुंबीय व नातेवाइकांनी एकच गर्दी केली. कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाने युवकाचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच नातेवाईक, नागरिकांसह विविध पक्षाचे नेते, संघटनांचे पदाधिकारी यांनी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यानंतर आमदार फुके रुग्णालयात येत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत मृत अरविंदच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी रुग्णालयाच्या फाटकासमोर ठिय्या मांडला. अरविंद चव्हाण हे 36 वर्षांचे असून गोरेगवा येथील महाजनटोली येथील रहिवासी आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी इस्पितळात गेले. त्यांनी मृताच्या नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर त्यांनी शवविच्छेदनास मंजुरी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.