

Mahayuti alliance tension over MLC seat: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू असतानाच भाजपने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी (ता.२९) ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती. पोटे पाटील यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. पण युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी पोटे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला होता. नवनीत राणाही पोटेंच्या उमेदवारीच्या विरोधात होत्या. राणा दाम्पत्याकडून भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नावाला समर्थन देण्यात आले होते.
प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्याला लोकसभेला विरोध केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रवीण पोटे प्रचारात सक्रीय झाले होते. पण प्रत्यक्ष निवडणुकीत पोटेंनी दगाफटका केल्यानेच लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे झाल्याचा दावा राणांकडून आजही केला जातो. त्यातूनच पोटेंच्या उमेदवारीला विरोध केला जात असल्याचे बोलले जात होते.
परंतु, अखेर प्रवीण पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून शुक्रवारी (ता.२९) दुपारी १२ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पोटे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी पालकमंत्री बावनकुळे तसेच भाजपचे आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता प्रवीण पोटे यांच्या कॅम्प रोडवरील जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
दुसरीकडे काँग्रेसने अद्यापही त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एक जून असल्याने एक-दोन दिवसांत काँग्रेसला त्यांचा उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनीसुद्धा या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज घेतले होते. आता त्यांचा दावा शेवटपर्यंत कायम राहतो किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.