यवतमाळ : मतदारसंघात ढगफुटी झाल्यामुळे नुकसानग्रस्त भागाच्या दौरा केल्याने मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीला आपण वेळेवर हजर राहू शकलो नाही. आपण बैठकीला उशिरा पोहोचलो असून खासदारांच्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी केल्याचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी स्पष्ट केले.
आपण शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच राहणार असल्याने माध्यमांनी अपप्रचार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर (Matoshri) सेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भाने पक्षाची भूमिका ठरविण्याबाबत ही बैठक होती. या बैठकीला राज्यातील काही खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे सेनेचे खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यात यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील खासदार हेमंत पाटील व खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्याही नावांचा उल्लेख होता.
खासदार हेमंत पाटील यांचा फोनही दिवसभर लागत नव्हता. त्यामुळे तेदेखील नॉट रीचेबल असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर रात्री त्यांनी मातोश्रीवर पोहोचल्यावर खुलासा केला. त्यांनी सांगितले की, गेल्या १६ वर्षांपासून नांदेडमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन केले जाते. काल रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता, तसेच आज सकाळी ढगफुटी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कर्तव्य म्हणून सर्वप्रथम लोकांच्या मदतीला जाणे गरजेचे होते. नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. मुंबईपासून आपण साडेसहाशे किलोमीटर दूर राहत असल्याने मातोश्रीवर वेळेत पोहोचू शकलो नाही.
बैठकीला अनुपस्थित असल्याचा माध्यमांनी अन्वयार्थ काढला. माझ्या बाबत अफवा पसरवल्या. कृपया अशा अफवा पसरवू नका, मी सुरुवातीपासूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, शिवसेनेसोबतच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण बैठकीला पोहोचू शकत नसल्याचे पक्षप्रमुखांना आधीच सांगितले होते, असेही ते म्हणाले. या बैठकीत काय निर्णय झाले, ते कळले नाही. राष्ट्रपती निवडणुकीबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच आपली असेल. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करू, असेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.