Forest Minister Sudhir Mungantiwar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सुरू असताना आज मोठी घडामोड झाली. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे शिंदे गटात आज दिवाळी साजरी केली जात आहे. भारताच्या राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाची ही सुरूवात असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मंत्री मुनगंटीवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रिय निवडणूक आयोगाने दिला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. आज सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.
केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत, असा हा स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिला आहे. पक्षातील लोकशाही बळकट करणारा हा निर्णय भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा, काही राजकीय पक्षांवर असलेली काही कुटुंबांची पकड ढीली करणारा आहे. या निर्णयामुळे भारतीय राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाला सुरूवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह प्रदान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध झाले : खासदार तुमाने
चाळीस आमदार आणि १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला फारसे कष्ट पडले नसावे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे पूर्व विदर्भातील एकमेव खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली.
शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार गेल्यानंतर अनेक खासदारही त्यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह विदर्भातील भावना गवळी यांचा समावेश आहे. खासदार तुमाने यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीणमधील शिंदे सेनेची कार्यकारिणीसुद्धा जाहीर करण्यात आली. नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत. आज निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) कोणाची यावर शिक्कामोर्तब केले आहे.
सुरुवातीला शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बंडंखोर असे संबोधले गेले. मात्र हे विचारांचे बंड होते. खरी शिवसेना आमचीच असल्याचे आयोगानेही निर्णय देऊन मान्य केले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारावर चालणारे शिंदे गटात सहभागी झालेले सर्व नेते व शिवसैनिक होते. हाच विचार घेऊन आमच्या शिवसेनेची वाटचाल सुरू राहणार आहे, असे खासदार तुमाने म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.