

Nagpur Congress Candidate Selection : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. एका एका जागेसाठी आठ ते दहा इच्छुकांनी दावेदारी दाखल केली आहे. कोणाला एकाला निवडले तर दुसरा नाराज होणार आहे. त्यामुळे उमेदवार कसा निवडायचा असा पेच काँग्रेस नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.
हे बघून काँग्रेसने कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार इच्छुकांवरच सोपवला आहे. मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी तिकिटासाठी दावा केला आहे. त्या प्रभागातील सर्वांनी आपसात बसावे आणि सर्वानुमते एक उमेदवाराचे नाव द्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता उमेदवारांच्याच कोर्टात चेंडू टोलवण्यात आला आहे.
भाजपपाठोपाठ नागपूर शहरात तिकीट मागणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी काँग्रेसमध्ये आहे. देवडिया काँग्रेस भवन येथे 2 दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. नेत्यांमधील भांडणामुळे काँग्रेस पराभूत झाल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. अनेक उमेदवार काही थोडक्या मतांनी पराभूत झाले होते. काँग्रेसच्या सुमारे 100 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.
यावेळी नेत्यांनी वादविवाद सोडल्यास हमखास पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. 5 वर्षांच्या कार्यकाळात भाजपचे मोजकेच नगरसेवक घराबाहेर पडले. निवडणूक झाल्यानंतर अनेकजण प्रभागात फिरकलेच नाहीत. मत मागायला आल्यानंतर नागरिकांना अनेक नगरसेवकांचे दर्शन झाले. त्यावरून शहरामध्ये भाजपच्या नगरसेवकांच्या विरोधात मोठी नाराजी आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनाही हे मान्य केले आहे.
याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. मात्र कोणाला एकाला तिकीट दिले तर बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. एका जागेसाठी पाच ते सहा जण दावा करीत आहेत. त्यावर काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी कोणी लढायचे, कोणाला तिकीट द्यायचे, कोण अधिक सक्षम याचा निर्णय इच्छुकांवरच सोपवला आहे.
आता इच्छुकांमध्ये एकमत होते की नाही हे बघाणे महत्त्वाचे राहणार आहे. काही निवडणूक उमेदवारांची नावे जवळपास निश्चित आहे. त्यात माजी नगरसेवकांसह पाच वर्ष सक्रिय राहिलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र चार सदस्यांचा प्रभाग असल्याने जातीय समिकरण, उमेदवाराच्या सक्रियता तसेच त्याची खर्च करण्याची क्षमता हेसुद्धा उमेदवाराचे नाव निश्चित करताना विचारात घेतले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.