
Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्यात आला होता. त्यावर आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणीसुद्धा घेण्यात आली. त्यानुसार काही बदल होतील अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, किरकोळ बदल करून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यावरून मोठी नाराजी आहे. काहीच बदल करायचे नव्हते तर सुनावणीचे नाटक कशाला केले असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वी 2017 च्या प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नव्याने प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्यावर आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणीसाठी राज्य सरकारने सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. सुमारे 115 हरकतींवर त्यांनी एकाच दिवशी सुनावणी घेतली.
आक्षेप घेणाऱ्यांमध्ये भाजपच्या (BJP) माजी आमदारांची संख्या सर्वाधिक होती. हर्डीकर यांनी सर्वांच्या हरकती व सूचना नोंदवून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबंधितांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी संबंधित हरकतीवर विचारणा केली होती. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या सूचनेनुसार बदल होती, अशी अपेक्षा होती. आपल्या प्रभागाला ग्रामीण भागाचा भाग जोडला असल्याचे स्थायी समितीचे माजी सभापती पिंटू झलके यांनी निदर्शनास आणून दिले होते. तो वगळण्यात आला आहे. हाच एकमेव सर्वाधिक मोठा बदल सुनावणीतून झाल्याचे समजते.
महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती बंटी ककुडे यांच्या आक्षेपानुसार कुठलेच बदल झाले नाहीत. त्यांच्या प्रभागाला शेजारच्या प्रभागाचा एक भाग जोडण्यात आला होता. तो काढावा व त्याच जुन्या प्रभागाला जोडावा, यासाठी त्यांनी हरकत नोंदवली होती. मात्र, यात काहीच बदल झाले नाहीत, असा आरोप होत आहे.
2017 च्या प्रभाग रचनेनुसारच यावेळी निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 तर काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. बसपाचे 10, शिवसेनेचे दोनच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ncp) एकच नगरसेवक निवडून आला होता. भाजपने यावेळी 130 नगरसवेक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.