Sulabha Khodke: नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजताच नागपूरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. हे वृत्त समजताच अनेकांनी शुक्रवारी सकाळीच गोंदियात धाव घेतली. नागपूरचे समन्वयक राजू जैन यांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या कानावर आपली नाराजी घातली. धक्कादायक म्हणजे या नियुक्तीची कल्पना त्यांनाही नव्हती असे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर नागपूरला घेण्यात आले होते. या शिबिरात प्रफुल पटेल यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नियुक्तांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी पटेल म्हणाले, ज्याला गावात कोणी ओळखत नाही तो मुंबईत नियुक्तीचे पत्र घेऊन मिरवतो. काही लोक गावात कमी मुंबईतच जास्त दिसतात. अशा नियुक्त्यांमुळे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते. बोगस माणसांना नियुक्त्या कोण देतो असा सवाल उपस्थित करून त्यांनी यापुढे हे खपवून घेणार नाही असा इशाराही दिला होता.
प्रफुल पटेल यांना संपूर्ण विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना डावलून काही नियुक्त्या झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता नागपूरच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाणारे नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस केल्याचे पुढे आले आहे. ही शिफारस करताना पटेल यांना विश्वासात घेण्यात आले नाही हे यावरून स्पष्ट झाले नाही. नागपूरच्या काही पदाधिकाऱ्यांनी नागपूर सोडून अमरावती विभागातील आमदारांना नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी नियुक्त करण्याची गरज काय अशी विचारणा करून आपली उघड नाराजी राजू जैन यांच्याकडे केली. राजू जैन हे प्रफुल पटेल यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासून आहेत. त्यांनी हा सर्व प्रकार प्रफुल पटेल यांच्या कानावर घातला. ते सध्या विदर्भात नाहीत. दोन दिवसानंतर या संदर्भात ते बोलणार असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनीसुद्धा आम्ही आमची नाराजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे सांगितले. सुधार प्रन्यास नागपूरच्या विकासासाठी स्थापन केलेल प्राधिकरण आहे. अमुक व्यक्तीलाच घ्या असा आमचा आग्रह नाही. पक्षाला जो व्यक्ती योग्य वाटेल त्याला नियुक्त करावे, फक्त तो नागपूर जिल्ह्यातील असावा असे मत अहीरकर यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.