

Nagpur local body elections : नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघात चार नगर परिषदांच्या होणाऱ्या निवडणुकीमुळे येथे पुन्हा काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे आमदार आशिष देशमुख हे परंपरागत शत्रू आमनेसामने येणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात केदार आणि देशमुख यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सुमारे पंचवीस वर्षांपासून त्यांचा आपसात लढा सुरू आहे. रणजित देशमुख हे काँग्रेसच बडे नेते होते. सावनेरमधून निवडून आले होते. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी सुनील केदारांनी बंडखोरी करून विधानसभेच्या निवडणुकीत देशमुखांचा पराभव केला होता.
या पराभवानंतर देशमुखांची राजकीय कारकीर्द संपली. निवडणूक लढण्याची संधी त्यांना काँग्रेसने (Congress) दिली. मात्र ते विजयी होऊ शकले नाहीत. यावेळच्या निवडणुकी रणजित देशमुख यांचे सुपुत्र आशिष देशमुख यांनी पराभवाचा वचपा काढला. केदारांच्या पत्नीला त्यांनी सावनेरमध्येच पराभूत केले. त्यामुळे केदार चांगलेच संतापले आहेत. आता नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे पुन्हा दोन्ही नेते आमने-सामने येणार आहेत. यात कोण बाजी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघात चार नगर परिषदा आहेत. यात खापा, सावनेर, मोहपा आणि कळमेश्वर ब्राम्हणीचा समावेश आहे. मागील वेळेस मोहपा वगळता तिन्ही नगर परिषदेत भाजपची (BJP) सत्ता होती. मोहपा येथे काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. त्यावेळी केदार राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळे तिन्ही ठिकाणी सत्ता नसल्याचे दुःख त्यांना फारसे नव्हते. अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारीसुद्धा आमदार म्हणून त्यांची ऐकून घेत. आता स्थिती बदलली. राज्यात सत्ता नाही. तसेच सुनील केदार आमदार नाही. त्यामुळे कार्यकर्ता वर्ग आधीच तुटला. तर अधिकारीवर्ग ज्याची सत्ता, त्यांची चाकरी करतात. त्यामुळे केदार यांचे पंख छाटले गेले.
नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, त्यांच्यासमोर भाजपसोबत त्यांचा पारंपरिक राजकीय वैरी आशिष देशमुख आहे. आशिष देशमुख हे सावनेरचे आमदार आहेत. दोघांतही विस्तव जात नाही. यामुळे दोघेही सत्ता कायम राखण्यासाठी ‘घोडे’ लावतील.
कळमेश्वर नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती. नगराध्यक्ष भाजपचा होता. मात्र, काँग्रेसचे आठ नगरसेवक होते. तर शिवसेनेचे दोन आणि भाजपचे पाच नगरसेवक होते. नगराध्यक्षपद भाजपकडे गेल्यानेही आपसूकच सत्ता भाजपची आली. खापामध्ये नगराध्यक्षसह 15 नगरसेवक भाजपचे निवडून आले. काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक निवडून आला होता. तर एका अपक्षाने बाजी मारली होती. सावनेरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होता. सोबत 11 नगरसेवक होते. ॲड. अरविंद लोधी यांच्या आघाडीचा इथं प्रभाव आहे. त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसला सहा जागेवर समाधान मानावे लागले.
मोहपा इथं काँग्रेसची एकहाती सत्ता होती. नगराध्यक्षासह 11 नगरसेवक निवडून आले होते. भाजपला केवळ पाच तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. आता स्थिती पालटली आहे. शिवसेना दोन गटात विभागल्याने पदाधिकारी विखुरले. आता थेट सामना काँग्रेस आणि भाजपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार आशीष देशमुख आणि सुनील केदार यांच्यात खऱ्या अर्थाने सामना रंगणार आहे. काँग्रेस जिंकली तर सुनील केदार जिंकले,भाजप हरली आशीष देशमुख हरले, असाच अर्थ यातून काढला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.