Nagpur Winter Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ या दोघांवरही अनेक आरोप आहे. परंतु या दोघांवरील आरोपांमध्ये बरीच तफावत आहे. मुश्रीफ यांच्यावरील आरोप आर्थिक गैरव्यवहाराची आहेत, तर नवाब मलिक यांच्यावरील आरोप देशद्रोह्यांशी संबंधित आहेत. मलिक यांच्यावरील आरोप अधिक गंभीर आहेत, त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे असं स्पष्ट मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
विधान भवनात दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी दानवे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, 'केंद्र सरकारकडून राजकीय हेतूने अनेकांवर चौकशी लावण्यात आली आहे. मात्र नवाब मलिक (Nawab Malik) यांचे प्रकरण वेगळे आहे. देश विघातक कारवाया करणारा दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.'
'ईडी, सीबीआय किंवा अन्य कोणत्याही आरोपांपेक्षा हे आरोप अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे आहेत. याच कारणामुळे त्यांना मोठा न्यायालय लढा द्यावा लागला. त्यामुळे यासंदर्भात मतभेद निर्माण होऊ शकतात, असे अपेक्षित होते. महायुतीच्या सरकारमध्ये मतभेद आहेतच. फक्त ते आता पुढे येऊ लागले आहे. आणखी थोडी प्रतीक्षा केली तर सरकारमधील तीनही पक्षांमध्ये काय काय घडते, ते बघायला मिळेल,' असेही अंबादास दानवे म्हणाले.
नीलमताईंना उत्तर द्यावं लागेल
'शिवसेनेने विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना भरभरून दिले आहे. इतके वर्ष त्या सभागृहाचे प्रतिनिधित्व करत आहे, यापेक्षा वेगळं त्यांना काय अपेक्षित होतं,' असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 'नीलमताई या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. हे पद अराजकीय आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय मुद्द्यांपासून स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'अनेकदा त्या स्वतःच उपसभापती असल्याचे नमूद करीत राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यापासून दूर राहतात. परंतु अलीकडच्या काळात त्या पक्षीय राजकारणावर बोलत आहेत. त्यांनी वेळीच स्वतःला आवर घालावी,' असा टोला दानवेंनी मारला आहे. 'नीलमताई सातत्याने जर अशा विषयांवर बोलणार असतील, तर त्यांना योग्य ते उत्तर द्यावाच लागेल. त्यावेळी मग त्या उपसभापती आहेत, हे नाईलाजानं विसरावं लागेल,' असा इशारा अंबादास दानवेंनी दिला आहे.
जनतेचे मुद्दे मांडणार
नागपुरातील हिवाळी अधिवेशन जनतेचे मुद्दे मांडण्यासाठी महत्त्वाचे असते. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशाच सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार नाही. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ही कमी करण्यात आला आहे. असे असले तरी शिवसेना जनतेच्या मुद्द्यावर आवाज बुलंद करेल. सभागृहामध्ये जनता आणि शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.