Nagpur : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना एकमेकांसमोर उभी टाकली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे त्यांचं तोंडही पाहत नाहीत. राज्याचा कारभार कसा गद्दारांच्या हाती गेला आहे, असे म्हणत ठाकरे शिंदेंवर तुटून पडतात.
एकीकडे हे चित्र तर दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे यांचे आमदार मात्र नागपूर विधिमंडळ परिसरात एकमेकांच्या गळाभेटी घेत असल्याचे चित्र दिसून आले. वैयक्तिक मैत्री, राजकारणापलीकडची मैत्री अशा गोंडस नावाखाली हे राजकीय नेते आपला स्वार्थ साधत असल्याची चर्चा या निमित्ताने होताना दिसते.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अपात्रतेच्या सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सुनील प्रभू व शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे विधिमंडळ परिसरात आज सोबत फिरताना दिसले. एकमेकांना टाळी देत, हातात हात घेत ते हास्यविनोदही करताना दिसले.
यावरून शिंदे- ठाकरे गटातील कटूता कमी तर होत नाहीये ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. की मग बेबनावाचे नाटक दोन्ही पक्षातील आमदार, मंत्री करत आहेत? असाही सवाल केला जात आहे. शिवसेनेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामध्ये प्रताप सरनाईक यांचीही महत्त्वाची भूमिका होती.
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून जाहीर पत्र पाठवल्यानंतर त्यांचीच री ओढत प्रताप सरनाईक यांनीही उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून टिका केली होती. गेल्या वर्षभरात ठाकरे आणि शिंदे यांचे आमदार एकमेकांवर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही तुटून पडलेले दिसले. पडद्यामागचे चित्र मात्र वेगळेच असल्याचे विधिमंडळ परिसरातील प्रभू आणि सरनाईक यांच्या मनमोकळ्या गप्पा आणि गळाभेटीमुळे समोर आले आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.