कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा प्रस्ताव सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मांडला होता, हे सर्वांनाच माहिती आहे. असे असतानाही सांगोल्याचे शिवसेनेचे (शिंदे गट)'काय झाडी, काय डोंगार...' फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी याचे श्रेय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले. या योजनेसाठी निंबाळकर यांनीही पाठपुरावा केला आहे, मात्र विजयसिंह मोहिते यांनी काहीही केले नाही, असे शहाजीबापू यांचे म्हणणे अर्धसत्य आहे. शहाजीबापू हे मोहिते पाटील घराण्याचे आधीपासूनच विरोधक आहेत. याशिवाय आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सांगोल्यात चकरा वाढल्या आहेत. परिणामी, मोहिते पाटलांना डिवचण्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केले आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मोहिते पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी नव्हे तर आपल्या संस्था वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये केली होती. मोहिते पाटील समर्थकांनी एक पत्र व्हायरल करून शरद पवार यांच्या टीकेला त्यावेळी उत्तर दिले होते.
मोहिते पाटील हे गेल्या नऊ वर्षांपासून शरद पवार यांच्याकडेच या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आहेत, असे दर्शवणारे ते पत्र होते. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून विजयसिंह मोहिते पाटील या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही या योजनेसाठी प्रयत्न केले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला, हे नाकारता येत नाही, मात्र या योजनेची कल्पना सुरुवातीला विजयसिंह मोहिते पाटील यांनीच मांडली होती, हेही सत्य आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कृष्णा-भीमा स्थिरीकरण हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरू शकते. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून पाणी वाहून जाते. त्या पाण्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण होते. हे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवले तर त्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सातारा जिल्ह्यातील माण, खटावसह पुणे, सोलापूर जिल्ह्यातील काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना हे पाणी उपलब्ध केले जाऊ शकते. याद्वारे या भागातील दुष्काळावर कायमची मात करता येणे शक्य होईल. खासदार निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी या योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. या योजनेसाठी जवळपास 20 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाकडे लक्ष वेधले होते. विजयसिंह मोहिते पाटील आणि शहाजीबापू पाटील हे पारंपरिक विरोधक आहेत. मोहिते पाटील यांनी सांगोला मतदारसंघात शेकापचे माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांनाच मदत करायचे. त्यामुळे शहाजीबापूंची अडचण व्हायची. आता मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. ही संधी साधून शहाजीबापू यांनी मोहिते पाटलांना डिवचले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार निंबाळकर हेच उमेदवार असतील असे संकेत दिले होते.
माढा लोकसभा मतदाारसंघातून खासदार निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बावनकुळे यांनी हा विषय मोहिते पाटील आणि आम्ही पाहून घेऊ, असे वक्तव्य केले. मोहिते पाटील कुटुंबीयांना डावलण्याचा धोका भाजप पत्करू शकत नाही, हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजप सावध असताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू यांनी मात्र मोहिते पाटील यांनी डिवचले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना हा उद्योग महागात पडू शकतो, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.