Congress On Mahayuti : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन जवळपास संपले आहे. यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. मात्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली की ओबीसींची असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य केली असेल तर ओबीसींची फसवणूक केलेली आहे. आरक्षणप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकारने फक्त एक अधिसूचना काढलेली आहे. त्यावर हरकती मागविल्या आहेत. सरकारने आरक्षणासंदर्भात अध्यादेश किंवा शासन निर्णय (GR) काढलेला नाही. खोटे बोलून संभ्रम तयार करीत मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे नाना पटोले म्हणाले.
मराठा आरक्षणप्रश्नी प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा दिला. सरकारने मागण्या मान्य कराव्या यासाठी लाखो समर्थकांसह त्यांना मुंबईला यावे लागले. सरकारचे प्रतिनिधी व जरांगे पाटील यांच्यात चर्चा होऊन रात्री सरकारने एक अधिसूचना काढली. सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करीत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. ही अधिसूचना तर सरकार अगोदरही काढू शकली असती. त्यासाठी एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट सरकार पहात होते का? असा सवाल नाना पटोले यांनी अकोला येथे बोलाताना केला.
मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पण या संपूर्ण घटनाक्रमात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार कुठेच दिसले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासही दोन उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. मग मराठा समाजाची ओबीसीतूनच आरक्षण दिले पाहिजे, या मागणीचे काय झाले? मराठा समाजाला आरक्षण दिले का? दिले असेल ते कसे दिले, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. असेही नाना पटोले म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारने मराठा आरक्षण मुद्द्यावरून समाजाला फसवले की ओबीसी समाजाला हेच कळत नाही. सगळा संभ्रम निर्माण करून सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार फसवाफसवीचे राजकारण करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्या आधीही अनेक आंदोलने झालीत. मराठा समाजाने 58 मोर्चे शांततेत काढले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे.
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटविणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी केली आहे. 30 जानेवारीपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकारने यावर निर्णय घ्यावा म्हणजे मराठा समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटतील, असे नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.